बालमनावर वाचन संस्कार रुजविणारे भिलवडीचे साने गुरुजी संस्कार केंद्र

सांगली जिल्हा पलूस तालुक्यातील भिलवडी येथील सानेगुरुजी संस्कार केंद्राचा रौप्य महोत्सवी वर्धापन दिन शनिवार दिनांक 19 जुलै 2025 रोजी विविध उपक्रमांनी साजरा होत आहे त्यानिमित्त.*)*
शाळेच्या चार भिंतीत मुलांना पुरेसे शिक्षण मिळू शकत नाही असं म्हणतात. केवळ पाठ्यपुस्तकांच्या अभ्यासाने सुद्धा मुलांचं व्यक्तिमत्व चौफेर घडतेच असे नाही. या सर्व बाबींवर विचार करून 2000 साली स्व. काकासाहेब चितळे यांच्या मार्गदर्शनाखाली भिलवडीच्या राम मंदिर येथे पूज्य साने गुरुजी संस्कार केंद्राचा शुभारंभ करण्यात आला. विद्यार्थ्यांचे व्यक्तिमत्व चौफेर घडावे जगण्यासाठी लागणारी शाश्वत जीवनमूल्य त्यांच्या अंतकरणावरती रुजावीत आणि वाचन संस्कार चळवळ अधिक गतिमान व्हावी या हेतूने या केंद्राचा शुभारंभ करण्यात आला. या शुभारंभाच्या वेळी श्रीमती सुनिता चितळे वहिनी आवर्जून उपस्थित होत्या. खरा तो एकची धर्म जगाला प्रेम अर्पावे हे ब्रीद वाक्य बाळगून साने गुरुजी संस्कार केंद्र भिलवडी आणि परिसरामध्ये गेली 25 वर्षे कार्य करीत आहे. वाचन चळवळ रुजवणे हे महत्त्वाचे कार्य संस्कार केंद्राचा ध्यास बनलेले आहे. आजवर संस्कार केंद्राचे वतीने सातत्याने शनिवार वाचन वर्ग, श्यामची आई पुस्तकाचे वाचन, श्यामची आई घरोघरी हवी,पर्यावरण पूरक सण, निर्माल्य संकलन, फटाके नको पुस्तके वाचू ,मूठभर धान्य गरजूंसाठी, शालेय विद्यार्थ्यांसाठी विविध स्पर्धा, पुस्तक वाचन स्पर्धा, काव्य लेखन स्पर्धा, वाचन लेखन कार्यशाळा, बाल वाङ्मयांच्या पुस्तकांचे प्रदर्शन इत्यादी अनेक उपक्रमांच्याद्वारे संस्कार केंद्र गेली 25 वर्षे आपली संस्कार चळवळ कृष्णा नदीच्या संथ वाहणाऱ्या पाण्याप्रमाणे भिलवडी आणि परिसरात राबवीत आहे. आजवर संस्कार केंद्रास ज्येष्ठ विचारवंत इंद्रजीत देशमुख बालसाहित्यिक स्वर्गीय दत्ता टोळ, गोविंद गोडबोले, रजनी हिरळीकर, नीलम माणगावे,सदानंद कदम, जयसिंगराव सावंत, वासंती मेरू, अमरसिंह देशमुख बापूसाहेब, दिनेश देशमुख डॉक्टर श्रीपाद जोशी शाहीर बजरंग आंबी, लोककलावंत संपत कदम, परिसरातील सर्व स्थानिक लोकप्रतिनिधी, पत्रकार, यांनी साने गुरुजी संस्कार केंद्रास वेळोवेळी भेट देऊन विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केलेले आहे. साने गुरुजी संस्कार केंद्राचे वतीने संस्कार कलश हा अभिनव उपक्रम गेली 25 वर्षे राबविला जात आहे. या उपक्रमांतर्गत संकलित होणारे धन विद्यार्थ्यांना साने गुरुजी शिष्यवृत्तीच्या रूपाने प्रतिवर्षी तीन मुला मुलींना वितरित केले जाते. याशिवाय शैक्षणिक साहित्याचे वाटप देखील केले जाते.
या संस्कार केंद्रास श्रीमती सुनिता चितळे वहिनी, श्रीयुत गिरीश चितळे, श्रीयुत मकरंद चितळे यांचेही सातत्याने सर्व प्रकारचे मोलाचे सहकार्य लाभत असते. श्रीमती सुनिता चितळे वहिनी गेली 25 वर्षे या केंद्राच्या प्रमुख विश्वस्त म्हणून कार्यरत आहेत. त्यांचे मार्गदर्शन लाख मोलाचे ठरलेले आहे.
आज समाजात जे प्रश्न भेडसावत आहेत त्या सर्व प्रश्नांचे मूळ वाचन दारिद्र्यात आहे. असे मला वाटते त्यामुळे शालेय जीवनापासूनच विद्यार्थ्यांच्या वरती वाचन आणि मूल्ये जर रुजवली तर भविष्यकाळात ते विद्यार्थी गुणवंत नागरिक म्हणून देशाचा आधारस्तंभ ठरतील. देशाची प्रगती निश्चितपणे करतील राष्ट्रभक्ती आणि विज्ञाननिष्ठा हे गुण वाढीस लागतील आपण समाजाचे देणे लागतो यासाठी सातत्याने समाजासाठी काहीतरी करत राहणे यातच खराखुरा आत्मिक आनंद आहे मला हा आत्मिक आनंद साने गुरुजी संस्कार केंद्राच्या माध्यमातून खूपच मिळालेला आहे . आज आमच्या केंद्राकडे असणाऱ्या 3000 पुस्तकांच्या साने गुरुजी वाचनालयाचा लाभ या परिसरातील अनेक विद्यार्थी सातत्याने घेत असतात. त्याच्यामुळे वाचन चळवळ रुजते आहे याचा मनोमन आनंद वाटतो आहे अशा भावना संस्कार केंद्राचे केंद्रप्रमुख सुभाष कवडे सर यांनी व्यक्त केलेल्या आहेत. भविष्यकाळातही हे संस्कार केंद्र या परिसरात कार्यरत ठेवण्याचा मानस श्री सुभाष कवडे यांचा आहे.