महाराष्ट्रराजकीय

तळोजा MIDC परिसरातील वाहतूक कोंडी होणार दूर : आमदार विक्रांत दादा पाटील यांच्या मागणीला यश

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे मोठे वाहनतळ उभारण्यासंदर्भात निर्देश

 

 दर्पण न्यूज मुंबई :- तळोजा एमआयडीसी ही पनवेल तालुक्यातील एक मोठी आणि महत्त्वाची औद्योगिक वसाहत असून येथे 1100 हून अधिक कारखाने कार्यरत आहेत. यामुळे या परिसरात मोठ्या प्रमाणावर अवजड वाहनांची वर्दळ होत असून, रस्त्यांवर प्रचंड वाहतूक कोंडी निर्माण होते. ही समस्या दिवसेंदिवस गंभीर होत चालली आहे. या समस्येमुळे स्थानिक नागरिक, कामगार वर्ग आणि उद्योगधंद्यांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे.या गंभीर प्रश्नाकडे लक्ष वेधत आमदार विक्रांत दादा पाटील यांनी सभागृहात ठाम भूमिका घेत, वाहतूक नियोजनाच्या अभावावर तीव्र शब्दांत आवाज उठवला.

सध्या उपलब्ध असलेल्या 140 वाहनांच्या क्षमतेचा वाहनतळ पूर्णपणे वापरला जात असल्याचे अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे; परंतु, प्रत्यक्षात वस्तुस्थिती तशी नसून पार्किंग मध्ये गाड्या न लावता रस्त्यावर अवजड वाहने पार्किंग करण्याचे प्रकार घडत आहे. यामुळे स्थानिक नागरिक आणि कामगार वर्गाला मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे.

आमदार विक्रांत दादा पाटील पुढे म्हणाले तळोजा येथील मारुती सुझुकी वॉशिंग सेंटर “या सेंटरला स्वतःची पार्किंग व्यवस्था नसतानाही परवानगी देण्यात आली आहे आणि याठिकाणी रस्त्यावरच वाहनांची पार्किंग होत आहे. ही बाब अत्यंत गंभीर असून, यामागे शासनातील काही अधिकाऱ्यांचे आशीर्वाद आहेत. अशा कर्मचाऱ्यांवर कारवाई होणार का? अशा प्रश्न त्यांनी सभागृहात उपस्थित केला.

“तळोजा परिसरात वाहतूक व्यवस्थापनासाठी ट्रॅफिक पोलिसांची संख्या अपुरी असून मनुष्यबळ वाढवणे गरजेचे आहे. यासाठी उपाययोजना केव्हा केल्या जाणार?” असा सवालही आमदार विक्रांत दादा पाटील यांनी यावेळी उपस्थित केला.

तसेच, “सध्या असलेले 140 क्षमतेचे वाहनतळ अपुरे पडत असून नवीन आणि अधिक क्षमतेचे ट्रक पार्किंग टर्मिनल उभारणे अत्यावश्यक आहे. याकरिता एमआयडीसीने नवीन भूखंड तातडीने उपलब्ध करून द्यावा आणि सुसज्ज पार्किंगची व्यवस्था करावी,” अशी ठोस मागणी आमदार विक्रांत पाटील यांनी यावेळी सभागृहात केली.

या मुद्द्यावर सकारात्मक प्रतिसाद देत सन्माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब व गृहराज्यमंत्री श्री पंकज भोयर
यांनी तातडीने वाहनतळाची क्षमता वाढविण्यासाठी नवीन वाहनतळ करण्यासंदर्भात निर्देश संबंधित अधिकाऱ्यांना दिले आहेत. तसेच येथील वाहतूक कोंडी दूर करण्याकरिता आढावा घेऊन योग्य ते सूचना देण्यात येतील असे मंत्री महोदयांनी स्पष्ट केले आहे.
आमदार विक्रांत दादा पाटील यांनी वाहतूक कोंडीच्या प्रश्नावर घेतलेल्या ठाम भूमिकेचे स्थानिक नागरिक, व्यापारी वर्ग व कामगारांनी मनापासून स्वागत केले आहे. अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेल्या वाहतूक कोंडीच्या समस्येकडे शासनाचे लक्ष वेधण्यात आमदार पाटील यशस्वी ठरले असून, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तत्काळ निर्देश दिल्याने नागरिकांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.

 

Share

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!