महाराष्ट्रसामाजिक

मुख्यमंत्री सौर कृषि वाहिनी योजनेतील प्रकल्प प्राधान्याने कार्यान्वित करावेत ; जिल्हाधिकारी अशोक काकडे

 

दर्पण न्यूज सांगली : शेतीसाठी दिवसा वीज देण्यासाठी राज्य शासनाच्या महत्त्वाकांक्षी मुख्यमंत्री सौर कृषि वाहिनी योजनेअंतर्गत सांगली जिल्ह्यातील प्रकल्प पूर्ण क्षमतेने कार्यान्वित करण्यासाठी संबंधित सर्व यंत्रणांनी परस्पर समन्वयाने गांभीर्याने कार्यवाही करावी. प्रलंबित बाबी तातडीने पूर्ण कराव्यात, सुरू असलेल्या व नव्याने सुरू होणाऱ्या प्रकल्पांसाठी टप्पेनिहाय वेळापत्रक तयार करावे व कालमर्यादा निश्चित करून ते प्रकल्प प्राधान्याने कार्यान्वित करावेत, अशा सूचना जिल्हाधिकारी अशोक काकडे यांनी आज येथे दिल्या.

मुख्यमंत्री सौर ऊर्जा कृषि वाहिनी योजनेच्या आढावा बैठकीच्या अध्यक्षस्थानावरून ते बोलत होते. जिल्हाधिकारी कार्यालयातील बैठक कक्षात आयोजित या बैठकीस महावितरणचे अधीक्षक अभियंता अमित बोकील, तहसिलदार अमोल कुंभार, उपमुख्य कार्यकारी अधिकारी (ग्रामपंचायत) शशिकांत शिंदे, अतिरीक्त कार्यकारी अभियंता देवदत्त हसबे, सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रफुल्ल कदम व मे. आवाडा एनर्जी प्रायवेट लिमिटेड कंपनीचे आर. के. राजपूत प्रत्यक्ष बैठकीस उपस्थित होते. दूरदृष्यप्रणालीव्दारे उपवनसंरक्षक नीता कट्टे, कडेगावचे उपविभागीय अधिकारी रणजीत भोसले, जतचे उपविभागीय अधिकारी अजयकुमार नष्टे, मिरजचे उपविभागीय अधिकारी समीर दिघे आदि उपस्थित होते.

मुख्यमंत्री सौर ऊर्जा कृषि वाहिनी ही राज्य शासनाची अत्यंत महत्वाकांक्षी योजना असून, या योजनेअंतर्गत प्रकल्प पूर्ण झाल्यानंतर शेतीसाठी दिवसा वीज उपलब्ध होणार आहे. त्यामुळे रात्रीचे अपघात टळतील. बळीराजा मोफत वीज योजनेतून ७.५ अश्वशक्तीपर्यंतच्या शेतीपंपांना मोफत वीज मिळणार आहे. जिल्ह्यात मुख्यमंत्री सौर कृषि वाहिनी योजनेतून एकूण 47 जागा निश्चित करण्यात आल्या असून, त्यापैकी 29 जागांचे क्षेत्र आवाडा या कंपनीस हस्तांतरीत करण्यात आले आहे. त्यातून 207 मेगावॅट वीज निर्मिती अपेक्षित आहे.

जिल्हाधिकारी अशोक काकडे म्हणाले, मुख्यमंत्री सौर कृषि वाहिनी योजनेतून जिल्ह्यातील बसर्गी, जिरग्याळ, कोसारी, तिकोंडी व माडग्याळ (ता. जत), मणेराजुरी (ता. तासगाव), माडगुळे व लिंगीवरे (ता. आटपाडी) या ठिकाणी नऊ प्रकल्प कार्यान्वित झाले आहेत. तर पळसखेल (ता. आटपाडी) या ठिकाणी लिंगीवरे उपकेंद्र करिताचे काम पूर्ण झाले असून पुजारवाडी उपकेंद्राचे काम प्रगतीपथावर आहे. त्याचबरोबर बेवनूर, बेळुंडगी, मोरबगी, शेड्याळ, हळ्ळी, कोन्तेव बोंबलाद (ता. जत), केरेवाडी (ता. कवठेमहांकाळ), भाग्यनगर (ता. खानापूर), शिरसगाव (ता. कडेगाव), मोराळे (पेड) व खुजगाव (ता. तासगाव) या ठिकाणचे कामही प्रगतीपथावर आहे. मे. आवाडा यांच्यामार्फत तांत्रिकदृष्ट्या योग्य असलेल्या पर्यायी जागेचे प्रस्तावाबाबत प्रस्तावित जागेची मोजणी करून त्याचे प्रस्ताव तातडीने सादर करावेत. गावच्या ग्रामस्थांना प्रकल्पाचे फायदे समजावून सांगावेत. प्रकल्पासाठी पोषक वातावरण निर्मिती करावी, असे त्यांनी यावेळी सूचित केले.

अधीक्षक अभियंता अमित बोकील यांनी या योजनेअंतर्गत जिल्ह्यात सुरू असलेल्या प्रकल्पांची सद्यस्थिती सादर केली. आवाडा कंपनीचे प्रतिनिधी यांनी प्रकल्प कार्यान्वित करताना भूमीसंपादन, सद्यस्थिती व येणाऱ्या अडचणी विषद केल्या.

Share

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!