कुची येथे विकसित कृषि संकल्प अभियान उत्साहात

दर्पण न्यूज सांगली : भारतीय कृषि अनुसंधान परिषद (आयसीएआर), नवी दिल्ली, वसंत प्रकाश विकास प्रतिष्ठान संचलित कृषि विज्ञान केंद्र (केव्हीके), सांगली, कृषि विभाग, सांगली, आणि आत्मा प्रकल्प, सांगली यांच्या संयुक्त विद्यमाने कुची (ता. कवठेमहांकाळ) येथे केंद्र शासनाचे महत्त्वाकांक्षी विकसित कृषि संकल्प अभियान उत्साहात पार पडले.
कार्यक्रमास सरपंच सहदेव गुरव, भारतीय कृषि अनुसंधान परिषदेच्या अबायोटिक स्ट्रेस मॅनेजमेंट इन्स्टिट्यूट, बारामतीचे ज्येष्ठ वैज्ञानिक डॉ. सुधीर कुमार मिश्रा (कृषि हवामानशास्त्र) कृषी विज्ञान केंद्र, कांचनपूर, मुख्य वैज्ञानिक डॉ. विपीन वाले, मृदा वैज्ञानिक शैलेश पाटील, कृषि विस्तार वैज्ञानिक सचिन कोल्हे आणि डॉ. अभिजित बाराते आदि उपस्थित होते.
डॉ. सुधीर कुमार मिश्रा यांनी बदलत्या हवामान परिस्थितीत जुळवून घेत शेतकऱ्यांनी पिकांचे रक्षण कसे करावे, तसेच, “दामिनी” आणि “मेघदूत” या मोबाईल अॅप्सचा वापर करून हवामानाशी संबंधित आपत्तींपासून मनुष्य, प्राणी व वित्त हानी कशी टाळता येईल, यावर मार्गदर्शन केले.
डॉ. विपीन वाले यांनी पशुपालनविषयक मार्गदर्शन करताना जनावरांच्या प्रजनन चक्राचे योग्य ज्ञान शेतकऱ्यांना असणे आवश्यक असल्याचे सांगितले. तर शैलेश पाटील यांनी शेतकऱ्यांना मृदा व पाणी परीक्षणानंतरच खतांचा वापर करण्याचे आवाहन केले, जेणेकरून मातीचे आरोग्य टिकवून ठेवता येईल.
सचिन कोल्हे यांनी मका पिकावरील फॉल आर्मीवर्म किडीचा धोका व त्यावरील उपाय सांगितले. तसेच त्यांनी सेंद्रीय भाजीपाला उत्पादन आणि सेंद्रीय धान्याच्या वापराला प्रोत्साहन दिले. यावेळी त्यांनी कृषि शास्त्रज्ञ शेतकऱ्यांच्या पाठीशी कायम उभे असून, त्यांच्या अडचणी सोडवण्यासाठी सज्ज असल्याची ग्वाही दिली.
कार्यक्रमाला प्रगतशील शेतकरी, शेतकरी गट, महिला शेतकरी आणि स्थानिक ग्रामस्थांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.कुची येथील प्रगतशील शेतकरी मोहन पाटील यांनी कृषी विज्ञान केंद्र, कांचनपूर (जिल्हा सांगली) यांचे सेंद्रीय शेती प्रशिक्षण दिल्याबद्दल आभार मानले.