पलूस तालुक्यात कृषी सहाय्यक संघटनेचे आंदोलन

दर्पण न्यूज पलूस ‘- सांगली जिल्हा पलुस तालुक्यातील कृषी सहाय्यक संघटनेचे राज्य संघटनेच्या आदेशानुसार पदोन्नती व इतर प्रलंबित मागण्यासाठी खरीप हंगामाच्या तोंडावर आंदोलनाची हाक दिली आहे.
विविध टप्प्यात हे आंदोलन करण्यात येणार असल्याचे संघटनेचे अध्यक्ष संतोष चव्हाण व सचिव पूनम जाधव यांनी सांगितले.
सध्या पलूस तालुक्यात एकूण 36 गावे असून कृषी सहायकांची एकूण 13 पदे मंजूर असून प्रत्यक्षात 10 कृषि सहाय्य्क पदे भरलेली आहेत.कृषी पर्यवेक्षकांची 2 पदे मंजूर आहेत.तर एकच मंडळ कृषि अधिकारी कार्यालय आहे. तालुक्यात दोन मंडळ कृषी अधिकारी कार्यालय व 25 कृषी सहायक यांची आवश्यकता असताना प्रत्यक्षात मात्र 13पदे मंजूर आहेत. सध्या प्रति कृषि सहाय्यक यांच्याकडे सरासरी तीन ते पाच गावांचा पदभार आहे.कृषी सहायकांना सेवेची वीस ते पंचवीस वर्षे सेवा होऊन देखील पदोन्नती मिळाली नाही.सद्यस्थितीत कृषी सहाय्यक व कृषी पर्यवेक्षक यांचे प्रमाण 6:1 याप्रमाणे आहे. ते 4:1 या प्रमाणात करण्यात यावे त्यामुळे कृषी सहायकांची पदोन्नतीची कुंठीत अवस्था दूर होऊन त्यांना पदोन्नतीच्या संधी उपलब्ध होतील. या व प्रत्यक्ष प्रक्षेत्रावर कामकाज करीत असताना कृषी सहाय्यकांना उद्भवणाऱ्या अडचणीची सोडवणूक करण्यात यावी यासाठी कृषी सहाय्यक संघटनेने आंदोलनाची भूमिका घेतली आहे.
कृषी सहाय्यक संवर्गाचे पदनाम बदलून सहाय्यक कृषी अधिकारी करण्यात यावे. कृषी सहाय्यक ते कृषी पर्यवेक्षक यांचे प्रमाण 4:1 याप्रमाणे करण्यात यावे. कृषी सेवक कालावधी रद्द करून कृषी सहाय्यक पदाचे आदेश देण्यात यावेत. कृषी विभागातील वाढत्या ऑनलाईन कामाचा व्याप लक्षात घेता कृषी सहायकांना लॅपटॉप उपलब्ध करून देण्यात यावेत. कृषी सहायकांना कायमस्वरूपी मदतनीस देण्यात यावा. कृषी निविष्ठा वाटपामध्ये सुसूत्रता आणावी. मग्रारोहयो अंतर्गत लक्षाक देताना क्षेत्रीय स्तरावरील अडचणीचा विचार करून लक्षांक देण्यात यावे. नैसर्गिक आपत्तीच्या पंचनामे करणे व तदनंतर करावयाच्या कामाबाबत महसूल, ग्रामविकास व कृषी विभागाच्या जबाबदाऱ्या बाबत योग्य न्यायसंगत कार्यपद्धती तयार करण्यात यावी. कृषी सहाय्यक संवर्गाच्या आस्थापनाविषयक अडचणीची सोडवणूक करण्यात यावी.
कृषी सहायकांना क्षेत्रीय पातळीवर काम करताना विविध अडचणींना तोंड देत काम करावे लागते. कृषी सहाय्यका वरील अन्याय विरोधात वरिष्ठ स्तरावरून कुठलीही दखल घेतली जात नाही असे कृषि सहाय्यक संघटनेचे म्हणणे आहे. त्यामुळे नाईलाजाने आंदोलनाची भूमिका घ्यावी लागत असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.
*आंदोलनाचे टप्पे*
1)दि. 05/05/2025 रोजी कृषी सहाय्यक काळ्याफिती लावून निषेध नोंदवून कामकाज करतील.
2) दि. 06/05/2025 रोजी पासून कृषी सहाय्यक सर्व शासकीय What’s App ग्रुप मधून बाहेर पडतील.
3)दि. 07/05/2025 रोजी सर्व तालुका कृषी अधिकारी कार्यालयासमोर सर्व सहाय्यक धरणे आंदोलन करतील.
4)) दि. 08/05/2025 रोजी एक दिवस कृषी सहाय्यक सामूहिक रजेवर जातील.
5)दि. 09/05/2025 रोजी पासून सर्व ऑनलाईन कामकाजावर बहिष्कार टाकतील.
यानंतरही कृषी सहाय्यक यांच्या प्रलंबित मागण्यांची सोडवणूक न झाल्यास
6)दि. 15/05/2025 रोजी पासून सर्व योजनांच्या कामकाजावर बेमुदत काम बंद आंदोलन करण्यात येईल, असे निवेदनात म्हटले आहे.