अन्न व औषध प्रशासनाची कारवाई ; 77 आस्थापनांचे परवाने सुधारणा करेपर्यंत निलंबित

दर्पण न्यूज मिरज/सांगली : अन्न व औषध प्रशासनातर्फे सन 2025-26 मध्ये आतापर्यंत अन्न आस्थापनांच्या करण्यात आलेल्या एकूण ३४३ तपासण्यांपैकी २४९ परवानाधारक पेढ्यांच्या तपासण्या करण्यात आल्या. त्यापैकी तपासणीमध्ये कायद्यामधील नमूद तरतुदींचे पालन न करणाऱ्या १८५ आस्थापनांना कलम ३२ अंतर्गत सुधारणा नोटीस बजावण्यात आल्या व त्यांना सुधारणा करण्याकरिता १४ दिवसांचा कालावधी देण्यात आला होता. सुधारणा न केलेल्या एकूण ७७ आस्थापनांचे परवाने सुधारणा करेपर्यंतच्या कालावधीकारिता निलंबित करण्यात आले असल्याचे सहायक आयुक्त (अन्न) नि. सु. मसारे यांनी प्रसिध्दीपत्रकाव्दारे कळविले आहे.
परवाना निलंबन कालावधीमध्ये सदर अस्थापनांनी व्यवसाय सुरूच ठेवल्यास अशा आस्थापनांवर न्यायानिर्णय अधिकारी, पुणे यांच्याकडे दंडाकरिता प्रकरणे दाखल करण्यात येत असतात. अन्न व औषध प्रशासन, सांगली कार्यालयाने अन्न सुरक्षा व मानके कायदा २००६ ची सांगली परिमंडळ – २ ( सांगली जिल्हा – ग्रामीण) मध्ये अंमलबजावणी करीत असताना सन २०२५-२६ मध्ये आजपर्यंत एकूण ३४३ अन्न पदार्थ उत्पादन व विक्री करणाऱ्या व्यवसायांच्या ऑनलाईन तपासण्या केल्या तसेच २५९ अन्न नमुने विश्लेषणांकरिता घेतले. एकूण २५९ अन्न नमून्यांपैकी ०४ नमुने असुरक्षित, १४ नमुने अप्रमाणित, ०२ नमुने मिथ्याछाप, १०२ नमुने प्रमाणित घोषित झाले आहेत व १३७ अन्न नमुन्यांचे अहवाल अद्यापपर्यंत प्रलंबित आहेत. अन्न सुरक्षा व मानके कायदा २००६ मधील तरतुदीनुसार असुरक्षित नमुने प्रकरणी न्यायालयामध्ये खटले दाखल होत असून अप्रमाणित व मिथ्याछाप नमुने प्रकरणी न्यायानिर्णय अधिकारी, पुणे यांचेकडे दंडाकरिता प्रकरणी दाखल होत असतात.
अन्न आस्थापनांच्या तपासण्या या अन्न सुरक्षा अधिकारी यांच्याकडून ऑनलाईन पद्धतीने कायद्यामध्ये नमूद विशिष्ट चेकलिस्ट नुसार केल्या जातात. माहे डिसेंबर मध्ये नव वर्षांच्या अनुषंगे जिल्ह्यांमध्ये विशेष मोहिम राबवून ६३ आस्थापनांच्या तपासण्या करण्यात आल्या असून ५४ आस्थापनांना सुधारणा नोटीस बजावण्यात आल्या होत्या. या तपासण्यांमध्ये हॉटेल, रेस्टॉरंट, स्वीट मार्ट, दुग्ध जन्य पदार्थ, बेकरी यांच्या तपासण्या करण्यात आल्या. सदर तपासण्यांमध्ये पेस्ट कंट्रोल न करणे, पाणी तपासणी न करून घेणे, अन्न पदार्थ हाताळणी करणाऱ्या व्यक्तींची वैद्यकीय तपासणी न करणे, उत्पादन कक्ष किंवा किचनमध्ये स्वच्छता केलेली नसणे, किटकांचा प्रादुर्भाव रोखण्याकरिता खिडक्यांना बारीक जाळी बसवलेली नसणे, कामगारांना प्रशिक्षित न करणे, आस्थापणाची इंटर्नल ऑडिट न करणे, ग्राहकांकरिता तक्रार नोंदविण्याची व्यवस्था उपलब्ध नसणे तसेच अन्न पदार्थांची विना खरेदी बिल खरेदी करणे अशा प्रकारच्या त्रुटि आढळून आल्या. त्यामुळे नागरिकांना सुरक्षित अन्न पदार्थ मिळण्याच्या दृष्टीने अन्न व्यावसायिकांनी कायद्यामधील तरतुदींचे पालन करणे आवश्यक असल्याचे प्रसिध्दी पत्रकात म्हटले आहे.
ग्राहकांनी अन्न पदार्थांबाबत कोणतीही तक्रार असल्यास प्रशासनाच्या fdasangli@gmail.com या ई- मेल वर किंवा टोल फ्री क्रमांक १८०-०२२२३६५ यावर संपर्क करावा, असे आवाहन श्री. मसारे यांनी प्रसिध्दीपत्रकाव्दारे केले आहे.
00000



