कृत्रिम बुध्दिमत्ता तंत्रज्ञान वापराबाबतची कार्यशाळा कायद्याचा पाया मजबूत करण्यासाठी उपयुक्त ठरेल : जिल्हाधिकारी अशोक काकडे
महसूल अधिकारी, सरकारी वकीलांचे कृत्रिम बुद्धिमत्ता तंत्रज्ञान वापराबाबत प्रशिक्षण

दर्पण न्यूज सांगली : जिल्ह्यातील सरकारी वकील व महसूल विभागातील अर्धन्यायिक कामकाज करणाऱ्या अधिकाऱ्यांसाठी आयोजित करण्यात आलेली कृत्रिम बुध्दिमत्ता तंत्रज्ञान वापराबाबतची कार्यशाळा न्यायालयीन कामकाजाच्या दृष्टीने त्याचबरोबर कायद्याचा पाया मजबूत करण्यासाठी उपयुक्त ठरेल, असे प्रतिपादन जिल्हाधिकारी अशोक काकडे यांनी केले.
राज्य शासनाच्या प्रशासनिक विभागांसाठी 100 दिवस कृती आराखड्यांतर्गत सांगली जिल्ह्यातील सरकारी वकील व महसूल विभागातील अधिकारी यांच्याकरिता कृत्रिम बुद्धिमत्ता तंत्रज्ञान वापराबाबत कार्यशाळा पार पडली. जिल्हाधिकारी अशोक काकडे कार्यशाळेच्या अध्यक्षस्थानी होते. जिल्हा सरकारी वकील ॲड. प्रमोद भोकरे, प्रभारी निवासी उपजिल्हाधिकारी अजय पवार, पोलीस उपाधीक्षक (गृह) दादासाहेब चुडाप्पा, अभियोग संचालनालयाच्या प्रभारी सहाय्यक संचालक सरकारी अभियोक्ता ज्योती डांगे आदि मान्यवर व्यासपीठावर उपस्थित होते.
जिल्हाधिकारी अशोक काकडे म्हणाले, नवनवीन तंत्रज्ञान सुरूवातीला अवघड वाटते. परंतु हे तंत्रज्ञान अवगत करणे काळाची गरज आहे. मानवी बुध्दी श्रेष्ठ आहे. आपल्या कामकाजात सुलभता येण्यासाठी कृत्रिम बुध्दिमतेचा वापर करावा. परंतु त्याची पडताळणी करणेही आवश्यक असल्याचे ते यावेळी म्हणाले.
सांगली जिल्हा प्रशासन व महाराष्ट्र ज्ञान महामंडळ, लि. यांच्या संयुक्त विद्यमाने जिल्हा नियोजन समिती सभागृह, जिल्हाधिकारी कार्यालय येथे हे प्रशिक्षण घेण्यात आले. न्यायिक व अर्धन्यायिक कामकाज सुलभ व सुकर करणे हा प्रशिक्षणाचा हेतू होता.
महाराष्ट्र ज्ञान महामंडळाचे वरिष्ठ व्यवस्थापक सचिन निरगुडकर, लर्निंग एक्सपिरिएन्स आर्किटेक्ट श्रद्धा गोटखिंडीकर, सहाय्यक व्यवस्थापक अनुपम क्षीरसागर यांनी या कार्यशाळेत मार्गदर्शन केले. तहसीलदार अमोल कुंभार, तहसिलदार लिना खरात, विधी अधिकारी वैशाली पवार व जिल्हाधिकारी कार्यालयातील अधिकारी व कर्मचाऱ्यांनी कार्यशाळा यशस्वी करण्यासाठी मेहनत घेतली.
प्रारंभी मान्यवरांच्या हस्ते रोपट्यास जल अर्पण करण्यात आले. या कार्यशाळेस सरकारी वकील, उपविभागीय अधिकारी, तहसिलदार, महसूल विभागाचे अधिकारी उपस्थित होते