जिल्हाधिकारी कीर्ती कुमार पुजार, जिल्हा परिषदेच्या समाज कल्याण विभागाकडून धाराशिव जिल्ह्यातील दिव्यांग खेळाडूंचा भव्य सत्कार

दर्पण न्यूज धाराशिव : धाराशिव प्रतिनिधी संतोष खुणे : –
नागपूर येथील रेशीमबाग मैदानावर २१ ते २३ मार्च २०२५ दरम्यान झालेल्या राज्यस्तरीय दिव्यांग क्रीडा स्पर्धेत धाराशिवच्या दिव्यांग खेळाडूंनी दमदार कामगिरी केली. अस्थिव्यंग, मतिमंद आणि बहुविकलांग या तिन्ही गटांत मिळून एकूण 50 पदके जिंकून धाराशिव जिल्ह्याने क्रीडाक्षेत्रात आपली छाप सोडली. या स्पर्धेत धाराशिवच्या दिव्यांग खेळाडूंनी २९ सुवर्ण, १३ रौप्य आणि ८ कांस्य पदके मिळवली.
या नेत्रदीपक यशाबद्दल धाराशिवचे जिल्हाधिकारी कीर्ती कुमार पुजार आणि जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. मैनाक घोष यांच्या हस्ते जिल्हा समाज कल्याण अधिकारी सुनील खमितकर यांनी सुवर्णपदक विजेत्या २९ दिव्यांग खेळाडूंना प्रत्येकी १०,००० रुपयांचे रोख पारितोषिक जिल्हा परिषदेच्या सेस फंडामधून देऊन त्यांच्या क्रीडा कौशल्याचा गौरव केला.यावेळी जिल्हाधिकारी कीर्ती कुमार पुजार, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. मैनाक घोष, सहाय्यक आयुक्त बाबासाहेब अरावत आणि जिल्हा समाज कल्याण अधिकारी सुनील खमितकर उपस्थित होते.
सदर समारंभात प्रास्ताविकपर भाषणात बोलताना धाराशिव जिल्हा परिषदेचे जिल्हा समाज कल्याण अधिकारी सुनील खमितकर यांनी धाराशिव जिल्ह्यातील दिव्यांग खेळाडूंना क्रीडा सुविधा आणि क्रीडाविषयक योग्य मार्गदर्शन मिळावे व भविष्यात धाराशिव जिल्ह्यातील दिव्यांग खेळाडूंना राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय पातळीवर कामगिरीसाठी तयार करता यावे यासाठी धाराशिव जिल्ह्यामध्ये दिव्यांग क्रीडा प्रबोधिनी सुरू करण्याची जिल्हाधिकारी कीर्तिकुमार पुजार व धाराशिव जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ मैनाक घोष यांच्याकडे मागणी केली.
*अंतिम पदकतालिका*
*अस्थिव्यंग* १६ सुवर्ण, ८ रौप्य, ६ कांस्य (एकूण ३० पदके)
*मतिमंद* ८ सुवर्ण, २ रौप्य, १ कांस्य (एकूण ११ पदके)
*बहुविकलांग* ५ सुवर्ण, ४ रौप्य (एकूण ९ पदके)
या स्पर्धेत धाराशिव जिल्ह्याने अस्थिव्यंग, मतिमंद आणि बहुविकलांग या तिन्ही गटात उपविजेतेपद पटकावले. या कार्यक्रमाला दिव्यांग कल्याण विभागातील वैद्यकीय सामाजिक कार्यकर्ते सच्चिदानंद बांगर, कार्यालयीन अधीक्षक मोहन चव्हाण, सहाय्यक लेखाधिकारी सुधीर जाधवर, संस्थाचालक शहाजी चव्हाण, ॲड. बी.आर. कलवले, मुख्याध्यापक बालाजी नादरगे, गुरुनाथ थोडसरे, भरत बालवाड, एम. जी. गायकवाड, स्थानिक स्तर समितीचे सदस्य व्यंकट लामजने, दिव्यांग कल्याण विभागातील बालाजी लोमटे, नेताजी शिरसट, बळी अण्णा, तसेच विजेते खेळाडू, प्रशिक्षक आणि सहाय्यक मोठ्या संख्येने उपस्थित होते.