इयत्ता बारावी पर्यंत मराठी विषय अनिवार्य करा* *मराठी विषय महासंघाचे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन

दर्पण न्यूज सांगली : – महाराष्ट्रात मराठी विषय इयत्ता बारावी पर्यंत सक्तीचा करण्याचा शासन निर्णय १३ सप्टेंबर २०२४ रोजी पारित झाला आहे. या निर्णयाची अंमलबजावणी येत्या शैक्षणिक वर्षापासून करावी यासाठी सांगली मराठी शिक्षक महासंघाचे जिल्हाध्यक्ष प्रा. बाबासाहेब पाटील आणि कार्यकारिणीच्या पदाधिकाऱ्यांनी सांगलीचे जिल्हाधिकारी मा. अशोक काकडे यांना निवेदन दिले.
गेल्या ऑक्टोबर महिन्यात केंद्र शासनाने मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा दिला आहे. १३ सप्टेंबर २०२४ रोजी राज्य शासनाने मराठी विषय इयत्ता बारावी पर्यंत सक्तीचा केलेला आहे; परंतु मराठी भाषाही सर्व विद्याशाखेत अनिवार्य करून शासन आदेशाची अंमलबजावणी येत्या शैक्षणिक वर्षापासून करावी यासाठी राज्य महासंघाचे अध्यक्ष सुनील डिसले , सचिव बाळासाहेब माने व कोषाध्यक्ष दिलीप जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली सांगली जिल्हाध्यक्ष प्रा. बाबासाहेब पाटील यांनी जिल्हाधिकारी यांच्यामार्फत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथराव शिंदे, उपमुख्यमंत्री अजित दादा पवार, शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे आणि मराठी भाषा व उद्योग मंत्री उदयजी सामंत यांना लेखी निवेदनाद्वारे विनंती केली आहे.
जिल्हाधिकारी यांना निवेदन देताना महासंघाच्या जिल्हा उपाध्यक्षा प्रा. मेघा अलासे, कार्याध्यक्ष प्रा. विजयकुमार शिंदे, सचिव प्रा. सुनील गवारी, जिल्हा कोषाध्यक्ष प्रा.सचिन टोपकर व प्रा.महावीर अलासे हे उपस्थित होते.