*फार्मर आयडी काढण्याचे काम गतीने पूर्ण करा : जिल्हाधिकारी अमोल येडगे*
ॲग्री स्टॅक योजनेअंतर्गत जिल्ह्यातील १ लाख ५० हजार शेतकऱ्यांचे फार्मर आयडी तयार*

दर्पण न्यूज कोल्हापूर, : कोल्हापूर जिल्ह्यातील ११ लाख ५० हजार शेतकऱ्यांना ॲग्री स्टॅक योजनेअंतर्गत फार्मर आयडी काढून देण्याचे काम सुरू आहे. जिल्ह्यातील बारा तालुक्यामधील १ लाख ५१ हजार ९६४ शेतकऱ्यांनी नोंदणी करून फार्मर आयडी काढले आहेत. ॲग्री स्टॅक अंतर्गत सुरू असलेले जिल्ह्यातील कामकाज समाधानकारक असून याच गतीने उर्वरित शेतकऱ्यांची नोंदणी फार्मर आयडीसाठी करण्याच्या सूचना जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी तालुकास्तरीय यंत्रणेला केल्या. जिल्हाधिकारी कार्यालयातील श्री शाहू सभागृहातून व्हीसीद्वारे त्यांनी तालुका प्रशासनाशी संवाद साधला. यावेळी उपजिल्हाधिकारी महसूल डॉ.संपत खिलारी, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी जालिंदर पांगारे, प्रांत अधिकारी हरीश धार्मिक, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. अनिरुद्ध पिंपळे, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सुप्रिया देशमुख, तहसीलदार स्वप्नील रावडे, आयुष्यमान भारत चे नोडल डॉ.रोहित तसेच तालुका स्तरावरून उप विभागीय अधिकारी, तहसीलदार, तालुका कृषी अधिकारी, तालुका आरोग्य अधिकारी तसेच अन्य अधिकारी उपस्थित होते.
कोल्हापूर जिल्हा दीड लाख शेतकऱ्यांचे फार्मर आयडी तयार करून राज्यात पाचव्या क्रमांकावर आहे. याच प्रकारे जिल्ह्यात ॲग्री स्टॅकचे काम सुरू राहिले तर फेब्रुवारी अखेर संपूर्ण जिल्ह्यातील ११ लाख ५० हजार शेतकऱ्यांचे फॉर्म आयडी काढून होतील. त्यामुळे प्रत्येक गावातील सुरू असलेल्या कॅम्पला गती देऊन सर्व फार्मर आयडी वेळेत पूर्ण होतील यासाठी यशस्वी नियोजन करण्याच्या सूचना त्यांनी सर्व तालुकास्तरीय यंत्रणेला केल्या. ॲग्री स्टॅक योजनेमधून फार्मर आयडी तयार करीत असताना प्राधान्याने प्रधानमंत्री किसान योजनेमधील लाभार्थ्यांचेही फार्मर आयडी काढण्याचे निर्देश त्यांनी दिले. जिल्ह्यात प्रधानमंत्री किसान योजनेमधील लाभार्थ्यांची संख्या ही ४ लाख ९६ हजार आहे. या सर्व शेतकऱ्यांचे फार्मर आयडी प्राधान्याने काढण्यासाठी विशेष मोहीम राबवण्याच्या सूचनाही त्यांनी यावेळी केल्या. पीएम किसान अंतर्गत शेतकऱ्यांना १९ व्या हप्त्याचे वाटप करण्यात येणार आहे. या अगोदार शेतकऱ्यांनी आपला फार्मर आइडी तयार करणे आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले.
प्रत्येक गावात यशस्वीरित्या ॲग्री स्टॅक योजनेचे कामकाज सुरू आहे. यावेळी मोठ्या प्रमाणात शेतकरी, नागरिक उपस्थित राहून आपले फार्मर आयडी तयार करीत आहेत. शासनाच्या महत्त्वकांक्षी प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेतील आयुष्यमान भारत कार्डही यादरम्यान वितरित करण्याचे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सर्व प्रशासनाला दिले आहेत. त्यानुसार गावामध्ये सुरू असलेल्या कॅम्प वेळी आरोग्य विभाग व गाव स्तरावरील आशाच्या मदतीने ठिकठिकाणी उपस्थित असलेल्या सर्व शेतकरी, नागरिकांचे प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेअंतर्गत कार्ड काढून देण्याच्या सूचना जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी तालुका प्रशासनाला दिल्या.
००००००