घाबरू नका… जीबीएस नवीन नाही.. दक्ष रहा

गुइलेन बॅरे सिंड्रोम (जीबीएस) चे रुग्ण जिल्ह्यात सापडत आहेत. या आजाराचे रूग्ण पहिल्यांदाच सापडलेत असे नाही. यापूर्वीही काहींना या आजाराचे निदान झाले आहे, निदान झालेले सर्व रूग्ण बरे झाले आहेत. त्यामुळे कोणीही घाबरून जाऊ नये, पण योग्य ती काळजी घ्यावी.
गुइलेन-बॅरे (Guillain-Barré) सिंड्रोम ही एक दुर्मिळ न्यूरोलॉजिकल डिसऑर्डर आहे. ज्यामध्ये आपली रोगप्रतिकारक शक्ती आपल्याच मज्जासंस्थेवर हल्ला करते. यामुळे शरीरात अचानक तीव्र बधीरपणा, मुंग्या येणे, स्नायू कमकुवत होणे, अचानक हातापायांतली ताकद नष्ट होणे यासारखी लक्षणे दिसू शकतात, जी अर्धांगवायू किंवा पक्षाघातापर्यंत पोहोचू शकतात. आधी पाय, नंतर हात आणि हळूहळू इतर अवयवांतील ताकद नष्ट होऊ लागते. वेळेवर निदान आणि उपचार अतिशय गरजेचे असतात.
उपचारानंतर बहुतेक लोक अगदी गंभीर जीबीएसमधूनसुद्धा पूर्णपणे बरे होतात. या आजाराची नेमकी कारणे माहीत नसली तरी जीबीएस झालेल्या 3 पैकी 2 लोकांना काही आठवड्यांपूर्वी अतिसार किंवा श्वसनाचे आजार झालेले आढळतात. काही जणांत विषाणू संक्रमण (व्हायरल इन्फेक्शन) नंतर GBS झालेला आढळला.
आजाराची सर्वसाधारण लक्षणे
* अचानक पायातील किंवा हातात येणारी कमजोरी / लकवा.
* अचानकपणे उद्भवलेला चालण्यातील त्रास किंवा कमजोरी.
* डायरिया (जास्त दिवसांचा).
उपचार
जिल्ह्यातील सर्व शासकीय आरोग्य व्यवस्थेमध्ये या आजारावर मोफत उपचार केले जातात. तसेच महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजनेअंतर्गत समावेश असलेल्या रुग्णालयांमध्येही या आजारावर उपचार मोफत होतात.
नागरिकांनी घ्यावयाची काळजी
* पिण्याचे पाणी दूषित राहणार नाही याची काळजी घेणे आवश्यक आहे. त्यासाठी पिण्याचे पाणी उकळून घ्यावे.
* अन्न स्वच्छ आणि ताजे असावे.
* वैयक्तिक स्वच्छतेवर भर देण्यात यावा.
* शिजलेले अन्न आणि न शिजलेले अन्न एकत्रित न ठेवल्यासही संसर्ग टाळता येईल.
लक्षणांनुसार होतात उपचार
अचानक पायातील किंवा हातात येणारा अशक्तपणा / लकवा, अचानकपणे उद्भवलेले चालण्यातील त्रास किवा अशक्तपणा व डायरिया (जास्त दिवसांचा) ही लक्षणे आढळल्यास त्वरित वैद्यकीय मदत घ्यावी. जीबीएसचे निदान होण्यासाठी काही चाचण्या केल्या जातात. लक्षणानुसार निदान आणि उपचार केले जातात. रुग्णांच्या रोगप्रतिकारक शक्तीनुसार हा आजार काही दिवसात पूर्णपणे बरा होतो. त्यामुळे कोणीही घाबरू नये. मात्र, लक्षणे दिसल्यास आरोग्य विभागाच्या यंत्राशी संपर्क साधावा. गेल्या तीन वर्षात जिल्ह्यात जी बी एस चे 53 संशयित रुग्ण होते, त्यातील 31 जणांचे निदान झाले. सर्वच्या सर्व रुग्ण पूर्णपणे बरे झाले आहेत.
पालकमंत्री चंद्रकांत पाटील, जिल्हाधिकारी डॉ. राजा दयानिधी आणि मुख्य कार्यकारी अधिकारी तृप्ती धोडमिसे यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्ह्यातील आरोग्य यंत्रणा जीबीएस आजाराचा मुकाबला करण्यासाठी सज्ज आहे.
संकलन – जिल्हा माहिती कार्यालय, सांगली