इंदापूर क्रीडा मंडळ, इंदापूरचा संघ कर्मवीर चषक २०२५ चा विजेता

दर्पण न्यूज इंदापूर. :-
श्री शिवाजी शिक्षण प्रसारक मंडळाचे संस्थापक कर्मवीर डॉ. मामासाहेब जगदाळे यांच्या १२२ व्या जयंतीच्या निमित्ताने आयोजित करण्यात आलेल्या भव्य राज्यस्तरीय कबड्डी स्पर्धेत इंदापूर क्रीडा मंडळ इंदापूर या संघाने स्वराज क्रीडा मंडळ भूम यांचा चुरशीच्या सामन्यात पराभव करून प्रथम क्रमांकाची ट्रॉफी पटकावली.
जनता विद्यालय येडशीच्या प्रांगणात सुरू असलेल्या भव्य खुल्या राज्यस्तरीय क्रीडा स्पर्धांचा थरार संध्याकाळी सहा वाजल्यापासून रंगला होता. बीड, अकलूज, गंगाखेड,
पाटोदा, काटगाव, पळसदेव, इस्लामपूर, इचलकरंजी, पुणे , इंदापूर यासारख्या ठिकाणांवरून आलेल्या खेळाडूंनी मैदान दणाणून गेले होते.
प्रत्येक सामना अतिशय अटीतटीचा झाला. उपान्त्य सामने जिंकून इंदापूर क्रीडा मंडळ इंदापूर व स्वराज क्रीडा मंडळ भूम यांच्यात अंतिम लढत रंगली यात इंदापूर क्रीडा मंडळ इंदापूर यांनी बाजी मारली. व रोख एकवीस हजार रुपये आणि ट्रॉफी पटकावली. द्वितीय क्रमांकाचे पंधरा हजार रुपये आणि ट्रॉफी स्वराज क्रीडा मंडळ,भूम यांना मिळाली तर तृतीय क्रमांक रामलिंग क्रीडा मंडळ, येडशी यांनी पटकावला चतुर्थ क्रमांक जयंत पाटील स्पोर्ट्स क्लब,इस्लामपूर यांना मिळाला.
एकूण ३८संघ या स्पर्धेत सहभागी झाले होते. धाराशिव जिल्हा कबड्डी असोसिएशनचे मोहन पाटील सर, हुंबे सर, प्रथमेश पाटील, व त्यांच्या टीमने अतिशय उत्कृष्ट पद्धतीने लाॅट पाडून सामने नियोजित पद्धतीने पूर्ण केले. पोलीस हवालदार आदिनाथ शिंदे व पोलीस कॉन्स्टेबल गंगाधर मुळखेडे यांनी चोख बंदोबस्त ठेवला त्याचबरोबर सामन्याचे समालोचन करून रंगत आणली. पारितोषिक वितरण विद्यालयाचे प्राचार्य चंद्रकांत नलावडे सर यांच्या अध्यक्षतेखाली पार पडले यावेळी अर्जुन भाई शेळके, कुमेश पवार मनोज पवार, उपप्राचार्य कांबळे सर पर्यवेक्षक चव्हाण सर व धाराशिव जिल्हा कबड्डी असोसिएशनचे पदाधिकारी यांच्या हस्ते पारितोषिके देण्यात आली. स्पर्धेचे नियोजन करण्यात श्री पंकज ठाकरे सर यांनी मोलाचा वाटा उचलला. दोन दिवसीय स्पर्धा पार पाडण्यासाठी जनता माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयातील सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी खूप परिश्रम घेतले.