धाराशिव: मुलाच्या मारेकऱ्यांना अटक होईपर्यंत इटळकर कुटुंबाचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आमरण उपोषण

दर्पण न्यूज धाराशिव प्रतिनिधी (संतोष खुणे) :-
धाराशिव – आपल्या बहिणीची छेड काढल्याचा जाब विचारण्यासाठी गेलेल्या मारुती इटळकर या एकुलत्या एक मुलाची हत्या करणाऱ्या आरोपींना अटक व्हावी आणि प्रकरणाचा तपास निःपक्षपातीपणे व्हावा, या मागणीसाठी इटळकर कुटुंबीयांनी आज जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आमरण उपोषण सुरू केले आहे. मारुतीचे आजोबा, आई-वडील आणि इतर कुटुंबीय या उपोषणात सहभागी झाले आहेत.पोलिसांवर राजकीय दबाव असल्याचा आणि त्यामुळे ते आरोपींना पाठीशी घालत असल्याचा गंभीर आरोप इटळकर कुटुंबाने केला आहे. घटनेला बराच काळ उलटूनही मुख्य आरोपीला अद्याप अटक करण्यात आलेली नाही आणि पोलीस तपासात हलगर्जीपणा करत आहेत, असे उपोषणकर्त्यांचे म्हणणे आहे.
या प्रकरणी शासनाने तातडीने लक्ष घालून वरिष्ठ पोलीस अधिकारी बस्वराज तेली यांच्या अध्यक्षतेखाली विशेष तपास पथकाची (SIT) नियुक्ती करावी, अशी प्रमुख मागणी इटळकर कुटुंबाने केली आहे. जोपर्यंत आमच्या मागण्या पूर्ण होत नाहीत आणि मुलाला न्याय मिळत नाही, तोपर्यंत उपोषण मागे घेणार नाही, असा निर्धार कुटुंबीयांनी व्यक्त केला आहे. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत असून, प्रशासनाच्या भूमिकेकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.