कुष्ठरोग निर्मूलन मोहीम प्रभावीपणे राबवा : मुख्य कार्यकारी अधिकारी तृप्ती धोडमिसे

दर्पण न्यूज सांगली : जिल्ह्यात संसर्गजन्य कुष्ठरोगाचे प्रमाण तसेच लहान मुलांमध्ये कुष्ठरोगाचे प्रमाण जास्त असल्याने राष्ट्रीय कुष्ठरोग निर्मूलन मोहीम प्रभावीपणे राबवावी, अशा सूचना जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी तृप्ती धोडमिसे यांनी आज दिल्या. जिल्हा परिषद येथे त्यांच्या दालनात कुष्ठरोग शोध अभियानाबाबत आयोजित बैठकीच्या अध्यक्षस्थानावरून त्या बोलत होत्या.
मुख्य कार्यकारी अधिकारी तृप्ती धोडमिसे म्हणाल्या, राष्ट्रीय कुष्ठरोग निर्मूलन कार्यक्रमांतर्गत सांगली जिल्ह्यात कुष्ठरोग शोध अभियान दि. 31 जानेवारी ते दि. 14 फेब्रुवारी 2025 या कालावधीत राबविण्यात येणार आहे. या अभियानादरम्यान ग्रामीण भागातील 100 टक्के लोकांची तपासणी करुन समाजातील दडून राहिलेल्या रूग्णांचा शोध घेऊन त्यांना बहुविध औषधोपचाराखाली आणण्याच्या सूचना त्यांनी यावेळी दिल्या. अभियानाच्या दरम्यान आरोग्य कर्मचाऱ्यांनी सर्व लोकांच्या घरोघरी जाऊन कुष्ठरोगाबाबत असलेले गैरसमज, भेदभाव व कुष्ठरोगाची शास्त्रीय माहिती देऊन त्यांची शारीरिक तपासणी करावी, अशा सूचना त्यांनी बैठकीत दिल्या.
यावेळी जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. विजयकुमार वाघ, जिल्हा समन्वयक तथा आरोग्य सेवा, कुष्ठरोग सहाय्यक संचालक डॉ. एस. बी. आलदर, जिल्हा क्षयरोग अधिकारी डॉ. जाधव, बाह्यसंपर्क अधिकारी डॉ. छाया पाटील, जिल्हा कार्यक्रम समन्वयक डॉ. विनायक पाटील, जिल्हा आशा समन्वयक अशोक लवटे, सांगली मिरज कुपवाड शहर महानगरपालिकेचे डॉ. विजय ऐनापुरे, जिल्हा परिषद जिल्हा माहिती व विस्तार अधिकारी प्रवीण जाधव, अवैद्यकीय पर्यवेक्षक एम.एम.शेख, अवैद्यकीय सहाय्यक श्री. टोकले व श्री. सय्यद उपस्थित होते.
सन 2023 मध्ये कुष्ठरोग शोध अभियान दि. 23 नोव्हेंबर 2023 ते 6 डिसेंबर 2023 या कालावधीत राबविण्यात आले होते. या अभियानात 62 कुष्ठरूग्णांचे निदान करण्यात आले होते. यापैकी 28 रूग्ण हे असंसर्गित व 34 रूग्ण हे संसर्गित कुष्ठरूग्ण प्रकारात मोडत होते, अशी माहिती बैठकीत देण्यात आली.