पात्र विद्यार्थ्यास शिष्यवृत्तीचा लाभ मिळण्यासाठी महाविद्यालयामध्ये समान संधी केंद्र स्थापन करावे : सहाय्यक आयुक्त नितीन उबाळे
शिष्यवृत्ती कामकाजाकरिता बैठक संपन्न

सांगली : अनुसूचित जाती प्रवर्गातील एकही पात्र विद्यार्थी शिष्यवृत्तीपासून वंचित राहणार नाही, यासाठी प्रत्येक महाविद्यालयामध्ये समान संधी केंद्र स्थापन करावे, अशा सूचना सहाय्यक आयुक्त, समाजकल्याण नितीन उबाळे यांनी दिल्या. सहाय्यक आयुक्त, समाज कल्याण, सांगली कार्यालयामार्फत शिष्यवृत्तीविषयक कामकाजाकरिता सामाजिक न्याय भवन सांगली येथे बैठक घेण्यात आली. या बैठकीत महाविद्यालयांच्या अडीअडचणींवर श्री. उबाळे यांनी मागदर्शन केले.
बैठकीत सांगली जिल्ह्यातील अनुसूचित जाती प्रवर्गातील जास्तीत जास्त पात्र विद्यार्थ्यांचे अर्ज भरण्याबाबत सूचना देण्यात आल्या. महाविद्यालयांचे प्राचार्य व महाविद्यालयातील शिष्यवृत्तीविषयक कामकाज पाहणारे कर्मचारी यांना अनुसूचित जाती प्रवर्गातील पात्र असणारा एकही विद्यार्थी शिष्यवृत्तीपासून वंचित राहणार नाही, याची दक्षता घेण्याच्या सूचना दिल्या. प्रत्येक महाविद्यालयामध्ये समान संधी केंद्र स्थापन करुन त्याद्वारे अनसूचित जाती प्रवर्गातील प्रवेशित विद्यार्थ्यांचे शिष्यवृत्ती अर्ज भरुन घेणे व सन 2023-24 व सन 2024-25 या वर्षामध्ये महाडीबीटी पोर्टलवर अनुसूचित जाती प्रवर्गातील पात्र विद्यार्थ्यांचे अर्ज दि. 24 जानेवारी 2025 पर्यंत समाज कल्याण विभागाकडे पाठविण्याच्या सूचना दिल्या. मागासवर्गीय विद्यार्थ्यांचे अर्ज वेळेत न भरल्यास व विद्यार्थी वंचित राहिल्यास संबंधितांवर कारवाई करण्याच्या सूचना देण्यात आल्या.
बैठकीस जिल्ह्यातील 64 महाविद्यालयातील प्राचार्य, शिष्यवृत्ती कामकाज पाहणारे कर्मचारी आदि उपस्थित होते.