आरोग्य व शिक्षणमहाराष्ट्र

आरोग्य योजनेतून रुग्णांना मोफत, चांगल्या दर्जाच्या आरोग्य सुविधा द्या : पालकमंत्री प्रकाश आबिटकर

येत्या वर्षभारात आजरा येथे 50 खाटांचे रुग्णालय : आजरा ग्रामीण रुग्णालयातील डायलिसिस केंद्राचे लोकार्पण

 

दर्पण न्यूज कोल्हापूर :- ‘मृत्युंजय’कार शिवाजीराव सावंत ग्रामीण रुग्णालय,आजरा येथे सुरु करण्यात येत असलेल्या मोफत डायलासिस सेवा केंद्र, महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजना व आयुष्मान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजनांच्या माध्यमातून रुग्णांना चांगल्या दर्जाच्या, मोफत आरोग्य सुविधा द्या. येत्या वर्षाभरात आजरा येथील सध्याचे रुग्णालय 30 बेड क्षमतेवरून 50 बेडचे करु, त्यासाठी आवश्यक सर्व सोयी-सुविधा उपलब्ध करुन दिल्या जातील, असे प्रतिपादन आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री तथा पालकमंत्री प्रकाश आबिटकर यांनी केले.

‘मृत्युंजय’कार शिवाजीराव सावंत ग्रामीण रुग्णालय,आजरा येथील मोफत डायलिसिस सेवा केंद्र, महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजना व आयुष्मान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजना लोकार्पण आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री तथा पालकमंत्री प्रकाश आबिटकर यांच्या हस्ते संपन्न झाले, त्यावेळी ते बोलत होते. याप्रसंगी आरोग्य उपसंचालक डॉ. दिलीप माने, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. सुप्रिया देशमुख, तहसिलदार समीर माने, आजऱ्याच्या माजी नगराध्यक्षा जोत्स्ना चराटे-पाटील, जयवंतराव शिंपी, ग्रामीण रुग्णालय आजराऱ्याचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. अमोल पाटील आदी मान्यवर उपस्थित होते.

आर्थिक दृष्ट्या सक्षम नसलेल्या सर्वसामान्य जनतेला शासकीय आरोग्य यंत्रणेच्या माध्यमातून चांगल्या दर्जाच्या आरोग्य सेवा देण्याचे काम व्हावे, त्यासाठी राज्यातील आरोग्य यंत्रणा अधिक सक्षम करण्यात येत आहे. असे सांगून पालकमंत्री प्रकाश आबिटकर पुढे म्हणाले, आजरा येथे सुरु होत असलेल्या डायलिसिस सेंटरच्या माध्यमातून रुग्णांचा आर्थिक भार कमी होणार आहे. महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजना व आयुष्मान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेमुळे आता मोफत औषधोपचार होणार आहेत. आरोग्य विभागातील सर्व यंत्रणांनी अधिक सक्षमपणे काम करुन रुग्णसेवा करावी. श्री.आबिटकर पुढे म्हणाले, सर्वसामान्य जनतेला आरोग्याच्या उपचारासाठी शहरात जावे लागते. यामुळे रुग्ण व नातेवाईकांना वेळ, पैसा तसेच मानसिक, शाररीक त्रासही सहन करावा लागतो. हे टाळण्यासाठी ग्रामीण रुग्णालय, प्राथमिक आरोग्य केंद्र अधिक सक्षम करण्यावर भर आहे. सर्व प्रकारच्या वैद्यकीय सेवा ग्रामीण भागात उपलब्ध करुन देवून सर्वसामान्य जनतेला आरोग्याच्या सेवा मोफत उपलब्ध करुन देण्यासाठी शासन काम करीत आहे.

प्रास्ताविकात आरोग्य उपसंचालक डॉ. दिलीप माने म्हणाले, आरोग्य खात्याला शासनाकडून राज्यात 359 ॲब्युलन्स देण्यात आल्या असून कोल्हापूर जिल्ह्यासाठी 9 ॲब्युलन्स मिळाल्या आहेत. राज्यामध्ये 449 डायलिसिस केंद्रे मंजूर करण्यात आला असून आतापर्यत 50 डायलेसिस केंद्र सुरु करण्यात आली आहेत. आजरा येथील ग्रामीण रुग्णालयात डायलिसिस सेंटरमध्ये 5 अत्याधुनिक बेड व डायलिसिस मशीन उपलब्ध करुन देण्यात आली आहेत. ग्रामीण रुग्णालय,आजराचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. अमोल पाटील यांनी रूग्णालयाच्या कामकाजाबाबत माहिती दिली. यावेळी आरोग्य विभागातील डॉक्टर्स, नर्स, आरोग्य कर्मचारी, विविध क्षेत्रातील मान्यवर, उपस्थित होते.

Share

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!