जतकरांना शुद्ध पिण्याचे पाणी मिळणार : पालकमंत्री चंद्रकांत पाटील
जत शहर पाणीपुरवठा योजनेचे भूमिपूजन ; नगरोत्थान महाअभियान योजनेतून 77 कोटी 94 लाखांचा निधी

दर्पण न्यूज सांगली – कर्नाटकच्या सीमालगतच्या जत तालुक्याच्या सर्वंकष विकासावर लक्ष केंद्रीत केले असून, पाणीपुरवठा योजनेच्या माध्यमातून जतच्या नागरिकाना शुद्ध पिण्याचे पाणी उपलब्ध होणार आहे, असे प्रतिपादन राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण, संसदीय कार्य मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी आज केले.
महाराष्ट्र सुवर्ण जयंती नगरोत्थान महाअभियानअंतर्गत जत शहराच्या पाणीपुरवठा योजनेच्या भूमिपूजन प्रसंगी ते बोलत होते. यावेळी आमदार सदाभाऊ खोत, आमदार गोपीचंद पडळकर, तहसीलदार प्रवीण धानोरकर, मुख्याधिकारी लक्ष्मण राठोड, पै. भीमराव माने आदि उपस्थित होते.
जतच्या विकासाचा असमतोल भरून काढू. जतच्या सर्वंकष विकासासाठी शासनस्तरावरून अधिकाधिक निधीसाठी प्रयत्न करू. तसेच, जिल्हा नियोजन समितीच्या माध्यमातूनही निधी उपलब्ध करून दिला जाईल, अशी ग्वाही देऊन पालकमंत्री चंद्रकांत पाटील म्हणाले, नगरोत्थान महाअभियान (राज्य स्तर) योजनेंतर्गत जत शहर पाणीपुरवठा योजनेसाठी 77 कोटी, 94 लाख रूपयांचा निधी मंजूर झाला आहे. ही पाणीपुरवठा योजना पूर्ण झाल्यानंतर जत शहरातील प्रत्येक घरासाठी दररोज पिण्याचे शुद्ध पाणी उपलब्ध होणार आहे. मात्र, पाणी उपलब्ध झाल्यानंतर नागरिकांनी भविष्यकालीन पाण्याचे संकट ओळखून पाण्याच्या वापर जपून करावा, असे आवाहन त्यांनी यावेळी केले.
आमदार सदाभाऊ खोत म्हणाले, जतमध्ये विकासाचे अनेक प्रकल्प येत आहेत. शेतीसाठी पाणी, पिण्यासाठी पाणी, रस्ते आदिंसाठी मोठ्या प्रमाणात निधी उपलब्ध करून देण्यात येत आहे. या माध्यमातून प्रलंबित प्रश्न मार्गी लागून जतच्या विकासास मदत होणार आहे.
ही पाणीपुरवठा योजना पूर्ण झाल्यानंतर जत शहरातील प्रत्येक घरासाठी दररोज पिण्याचे शुद्ध पाणी उपलब्ध होणार आहे, असे सांगून आमदार गोपीचंद पडळकर म्हणाले, जत शहराचा चेहरामोहरा बदलण्यासाठी विकासाच्या योजना आखू. जतच्या विकासासाठी आराखडा तयार करण्यात आला असून, टप्प्याटप्प्याने जतचा विकास करण्यात येईल. रस्ते, आरोग्य सुविधा, अंगणवाड्या, जिल्हा परिषद शाळांना वर्गखोल्या यासाठी निधी उपलब्ध करून दिला जाईल. जतला उपप्रादेशिक परिवहन कार्यालय मंजूर करण्यात आले आहे, असे सांगून त्यांनी यावेळी जत नगरपरिषदेसाठी इमारत, सांडपाणी व्यवस्थापनासाठीच्या प्रस्तावास मंजुरी, जतचा पर्यटन विकासासाठी शहरात बगिचा व वॉटर पार्क आदि मागण्या केल्या.
नगरोत्थान महाअभियान (राज्य स्तर) योजनेंतर्गत जत शहर पाणीपुरवठा योजनेमध्ये संपूर्ण जत शहरामध्ये एकूण 190 कि. मी. जलवाहिनी टाकणे, 2.50 लाख लिटर्स, 5.25 लाख लिटर्स, 10.10 लाख लिटर्स व 0.40 लाख लिटर्स अशा चार नवीन पाण्याच्या टाक्या बांधणे, नवीन जलशुद्धीकरण केंद्र बांधणे व नवीन 18 पंप बसवणे या कामांचा समावेश आहे.
प्रारंभी मान्यवरांच्या हस्ते जत शहराच्या पाणीपुरवठा योजनेच्या भूमिपूजन करण्यात आले. तसेच छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. यावेळी — नगरपरिषदेचे अधिकारी व कर्मचारी, स्थानिक लोकप्रतिनिधी, नागरिक, महिला मोठ्या संख्येने उपस्थित होते.


