राष्ट्रीय बाल स्वास्थ्य कार्यक्रमांतर्गत 225 लाभार्थ्यांची मोफत 2 डी इको तपासणी
सांगली : राष्ट्रीय बाल स्वास्थ्य कार्यक्रमांतर्गत जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. विक्रमसिंह कदम यांच्या मार्गदर्शनाखाली मोफत 2 डी इको तपासणी शिबीराचे आयोजन करण्यात आले. या शिबीरामध्ये एकूण 225 लाभार्थ्यांची तपासणी करण्यात आली. यापैकी 35 लाभार्थ्यांना अत्यंत गुंतागुंतीच्या ओपन हार्ट शस्त्रक्रिया आवश्यक असल्याचे निदर्शनास आले. डॉ. विक्रमसिंह कदम यांनी या शस्त्रक्रिया महात्मा फुले जन आरोग्य योजना, धर्मादाय संस्था, खाजगी रक्कम दाते यांच्या अनुदानामधून पूर्ण करणार असल्याचे लाभार्थ्यांच्या पालकांना आश्वासित केले.
राष्ट्रीय बाल स्वास्थ्य कार्यक्रम व डीईआयसी यांच्या संयुक्त विद्यमाने डीईआयसी इमारत सांगली येथे या शिबीराचे आयोजन करण्यात आले. शिबीराकरिता महात्मा जोतीबा फुले जन आरोग्य योजनेअंतर्गत मुंबई येथील करारबध्द बालाजी हॉस्पिटल या रुग्णालय येथील तपासणी पथक उपस्थित होते. बालहृदयरोग तज्ज्ञ डॉ. भूषण चव्हाण यांनी लाभार्थ्यांची इको तपासणी केली. यासाठी प्रतिक मिश्रा यांनी नियोजन केले. सर्व तालुक्यातील राष्ट्रीय बाल स्वास्थ्य कार्यक्रमामधील पथकांनी गाव, वाडी, वस्ती, तळ इथपर्यंत तपासणी करुन हृदयरोग संशयित लाभार्थी उपस्थित ठेवले.
विटा येथील शस्त्रक्रिया पूर्ण झालेल्या लाभार्थ्यांने डॉ. कदम यांची भेट घेवून शस्त्रक्रिया मोफत व यशस्वीरित्या पूर्ण करुन बालकांस जीवदान मिळण्यासाठी सहकार्य केल्याबद्दल गुलाबपुष्प देवून आभार मानले. हा क्षण अत्यंत आनंदाचा व समाधानकारक असल्याचे जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. कदम यावेळी म्हणाले.
राष्ट्रीय बाल स्वास्थ्य कार्यक्रम हा जिल्ह्यामध्ये अत्यंत प्रभावीपणे राबविला जात असून राष्ट्रीय बाल स्वास्थ्य कार्यक्रमाचे सर्व वैद्यकिय अधिकारी, औषधनिर्माता व परिचारीका यांचे जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. कदम यांनी कौतुक केले.
शस्त्रक्रिया पात्र लाभार्थ्यांना मोफत प्रवास, निवास व भोजन व्यवस्थेसह तसेच आवश्यक कागदपत्रांसह पुढील आठ दिवसात शस्त्रक्रियेकरिता मुंबई येथील रुग्णालयात दाखल करण्यात येणार आहे. शिबीरांकरिता अतिरीक्त जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. विभीषण सारंगकर यांच्या मार्गदशनाखाली जिल्हा कार्यक्रम समन्वयक डॉ. प्रमोद चौधरी, कार्यक्रम सहाय्यक अनिता हसबनीस, व्यवस्थापक कविता पाटील, रोहित चौगुले, सत्यजित वडेर, शितल कुंभार, इंदु पाटील, अर्सिया जमादार व इतर अधिकारी व कर्मचारी यांनी सहकार्य केले. शिबीराकरिता विटा येथील प्रशांत कदम उपस्थित होते.