प्रकाश पेरणी ‘ सकारात्मक दृष्टिकोन निर्माण करणारा कवितासंग्रह

..
भिलवडी येथील ज्येष्ठ साहित्यिक सुभाष कवडे हे नामवंत कवी,लेखक, बालसाहित्यिक आहेत. साहित्य व शिक्षण क्षेत्रामध्ये त्यांची उल्लेखनीय कामगिरी आहे. लहान मुलांना वह्या,पुस्तकांची गोडी लागावी,शाळेची आवड लागावी यासाठी त्यांनी केलेले प्रयत्न वाखाण्यासारखे आहेत. शिवारमाती, निरंजन, पाखरांच्या स्वरांचे अस्तित्व ,समईच्या वाती हे त्यांचे यापूर्वी गाजलेले कविता संग्रह आहेत. अधोरेखित,वाटा पायवाटा, जांभळमाया ,प्रकाशाची बेटे हे ललित गद्य संग्रह प्रसिद्ध आहेत. बाल साहित्यामध्ये गंमत गाणी,संस्कार शिदोरी, श्यामची आई पुस्तकातील संस्कारधन, हिरवी हिरवी झाडे ही पुस्तके लोकप्रिय आहेत. कवडे सरांचे लेखन वाचत असताना असे वाटते जणू काही ते साने गुरुजींचा, ग दि माडगूळकरांचा वारसा चालवत असावेत. शब्दांमधला हळुवारपणा, गोडवा तसेच संकेत देतात.कवडे सरांच्या कार्याची दखल घेत अनेक पुरस्कार दिले गेले आहेत. साहित्य संमेलन,कवी संमेलनामधून पदे भूषवले आहेत.शिरोळ तालुक्यामधील शिरढोण येथील ११ व्या संवाद ग्रामीण साहित्य संमेलनाचे ते अध्यक्ष आहेत.
‘ प्रकाश पेरणी ‘ हा कवितासंग्रह आदर्श आहे. दुःखी ,कष्टी माणसाच्या मनाला उभारी देणारा, जिव्हाळा निर्माण करणारा आहे. कोरोना सारखी महामारी आनंद दे पुन्हा न्यारा, माणूस सांभाळून, कळत नाही, दे रे आता बळ या कविता मधून दिसते. तर मानवतेच्या केल्या आरत्या, पाऊस नकोसा वाटायचा, माझी कृष्णाई या कविता मधून पाऊस,पाणी,पूर यामधून झालेली दयनीय अवस्था व्यक्त झालेली आहे.
पर्यावरण,शेती,शिक्षण, राजकारण,भक्ती असे अनेक विविध विषय कवीने हाताळले आहेत. ‘एक झाड हो छोटे ‘ या कवितेमधून दुसऱ्यासाठी जगत राहण्याचा संदेश दिला आहे. तारुण्य हा आयुष्यातला सर्वात सुवर्णकाळ असतो. या काळात ध्येय ठरवून वाटचाल केली पाहिजे असा संदेश ‘उजेड ‘ या कवितेमधून केला गेला आहे. ‘ प्रकाशाचा गाव ‘ या कवितेमधून आयुष्यात अनेक आणि अडचणी आल्या तरी निर्भीडपणे वाटचाल करायची असते असा संदेश केला गेला.
आजच्या शिक्षण व्यवस्थेचे झालेली दुरावस्था प्रयोग, ऑनलाइन शिक्षण, गुरुजी, तसला मोबाईल या कविता मधून दिसते. प्रयोग या कवितेमध्ये कवीने प्रश्न उपस्थित केला आहे.
‘प्रयोगाच्या या रानात कोणते पीक पुरते आहे ? ‘
काळाच्या ओघात बदलत चाललेली गावं,माणसं ही.. हरवलेला ओढा, गावच्या रस्त्यात, माणसांच्या दुनियेत, जगण्याचे बी रुजते या कविता मधून दिसतात.
कवीला सर्वत्र समता,बंधुता अपेक्षित आहे त्यामुळे कोरोनाच्या काळात भेदभाव विसरून लोक एकमेकांच्या मदतीला धावून आले हे त्यांना महत्त्वाचे वाटते. ही अशी प्रचंड एकी पंढरपूरच्या वारीमध्ये दिसते त्यामुळे विठ्ठल,वारी,संत यांचे महत्त्व काही कवितांमधून मांडलेलं आहे.परमेश्वरावरची आघाद श्रद्धा अगा पांडुरंगा, माझी पंढरीची वाट, मनोमनी वारीमध्ये, कर नवी युक्ती, लागो दर्शनाची बारी, विठू माझा,ज्ञाना- तुकोबाचा संग अशा कविता मधून दिसते.
प्रकाश पेरणी या कवितासंग्रह मधील प्रत्येक कवितेचा एक वेगळे महत्त्व आहे परंतु माणसांच्या दुनियेत, उजेड,परंपरा आई होण्याची, भर उनात ,प्रकाश पेरणी या कविता स्टार प्लस आहेत. वाचकाच्या नजरेसमोर प्रत्यक्ष चित्र उभा करतात. उदा. भर उनात कवितेमध्ये
‘भर उन्हात रस्त्यावर भेटला होता सावळा
गळा भरून दाटल्या होत्या मोतियांच्या मळा ‘काही कवितांमधून प्रश्न मांडलेले आहेत तर त्याचे उपायही सांगितले आहेत. काही कवितांमधून सूचना दिल्या गेलेले आहेत उपदेश केला गेलेला आहे. कवी स्वतः कोणत्याही गोष्टीची अपेक्षा न ठेवता आपलं काम करत राहतात याची प्रचिती प्रकाश पेरणी, नको मजला गौरव या कवितेमधून येते.
‘ पद पैसा प्रसिद्धीचा
नाही हव्या मजला
गजबजलेल्या बाजारी
न्याय हा नवा कुठला ‘साधी,सोपी,सरळ,भाषा शैली वाचकाला भावते. साडेतीन चरणाच्या सहा ओव्या, प्रत्येक चरणात चार शब्द. पहिल्या ,दुसऱ्या आणि तिसऱ्या चरणात यमक साधलेला आहे. या कवितासंग्रहामध्ये पंढरीची वाट ,तुझी मोतीयाची माळ, नको मजला गौरव,सदा आनंदी राहावे, याद सतावे, मला भेटते कविता या अष्टाक्षरी ओळीच्या काही चारोळी दिसतात. छंद, अलंकार ,दृष्टांत, प्रतीके अनेक कवितांमध्ये ठासून भरली आहेत. कवितेचा आशय वाचकाला पटकन अवगत होतो. म्हणून ती आवडते.
प्रकाश पेरणी या शीर्षकाला साजेल असं मुखपृष्ठ आहे. कवितांची मांडणी आकर्षक छपाई मजबूत बायंडिंग यामुळे ही पुस्तकाला दर्जा प्राप्त झालेला आहे. निश्चितच कविताची आवड असणाऱ्या प्रत्येकाने प्रकाश पेरणी वाचली पाहिजे.कवी सुभाष कवडे आणि प्रकाशक यांचे अभिनंदन करावे लागेल त्यांच्या भावी वाटचालीस शुभेच्छा.
..
पुस्तक – प्रकाश पेरणी
कवी – सुभाष कवडे
प्रकाशक – गोल्डन पेज पब्लिकेशन
संपर्क -96652 21822
…
शब्दांकन – मनोहर भोसले सैनिक टाकळी,ता.शिरोळ