रानभाजी महोत्सव राज्यस्तरावर आयोजित व्हावा : कोल्हापूरचे पालकमंत्री प्रकाश आबिटकर

दर्पण न्यूज कोल्हापूर – : पावसाळी कालावधीत केवळ डोंगरदऱ्यात उगवणाऱ्या या रानभाज्या निरोगी आयुष्य तसेच जीवनशैलीसाठी पण त्या अत्यंत उपयुक्त आहेत .या रानभाज्यांचा महोत्सव केवळ जिल्हास्तरावर न होता तो राज्यस्तरावरही साजरा करण्यात यावा अशी अपेक्षा पालकमंत्री प्रकाश आबिटकर यांनी व्यक्त केली .
राजारामपुरीतील व्ही .टी .पाटील स्मृती भवन या ठिकाणी आयोजित करण्यात आलेल्या जिल्हास्तरीय रानभाजी महोत्सव व पाककला स्पर्धा सन 25-26 उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते . यावेळी व्यासपीठावर विभागीय कृषी सह संचालक बसवराज मास्तोळी, जिल्हाध्यक्ष कृषी अधिकारी तथा आत्म्याचे प्रकल्प संचालक जालिंदर पांगरे ,अधिक्षक कृषी अधिकारी अजय कुलकर्णी , रानभाज्या तज्ज्ञ डॉ .शहाजी कुरणे आदी उपस्थित होते .
पालकमंत्री म्हणाले , या रानभाज्यात पौष्टिकता, सात्विकता आणि आरोग्यवर्धक गुण असतात मात्र याला हवे तसे मार्केटिंग मिळत नसल्याची खंत व्यक्त करून या रानभाज्यांचा हॉटेल व्यवसाय कसा सहभाग नोंदविता येईल , या संदर्भात आपण लवकरच जिल्ह्यातील हॉटेल असोसिएशन बोलू अशी ग्वाही दिली .
हा रान भाजी महोत्सव कोल्हापूरसह सांगली, सातारा या ठिकाणी आयोजित करण्यात आल्याचे सांगून सुमारे दीडशे महिला बचत गटांनी यामध्ये सहभाग नोंदवून , साडे चारशेहून अधिक विविध प्रकारच्या खाद्य कलाकृती निर्माण केल्याचे बसवराज मास्तोळी यांनी प्रास्ताविकात सांगितले . यावेळी रानभाजी मांडणी स्पर्धेत निता पडवळ (प्रथम) , कुडूत्री ( राधानगरी ) येथील संघटीत महिला बचत गट (द्वितीय) , कातळी येथील कविता जाधव यांना (तृतीय) तर पिरळ – राधानगरी येथील शितलाम महिला बचत गटास उत्तेजनार्थ त्याचबरोबर पाककृती स्पर्धेत राधानगरी येथील पूजा पाटील (प्रथम) , हातकणंगले तालुक्यातील भादोले येथील शोभादेवी पाटील (द्वितीय ) तर कदमवाडी येथील तुळजाभवानी महिला बचत गटाच्या राणी कदम यांना पालकमंत्र्यांच्या हस्ते स्मृतीचिन्ह,प्रमाणपत्र व पुष्पगुच्छ देवून गौरविण्यात आले .
परिक्षक म्हणून श्रीमती अश्विनी भोसले , दिपाली मस्के, पल्लवी दुधाणे , जयश्री हावळे , दिपाली सुतार , शितल जाधव यांनी काम पाहिले . यावेळी पालकमंत्र्यांच्या हस्ते,’रानभाजी माहिती पुस्तिका’ प्रकाशित करण्यात आली. दि 9 ऑगस्ट रोजी म्हैसूर -बेंगलोर या ठिकाणी महाराष्ट्र शासन पुरस्कार प्राप्त अशा जिल्हयातील शेतकऱ्यांचा अभ्यास दौरा आयोजीत करण्यात आला होता . या दौऱ्याच्या यशस्वी पूर्ततेनिमित्त सहभागी शेतकऱ्यांकडून पालकमंत्री आबिटकर यांचा विशेष सत्कार या महोत्सवामध्ये करण्यात आला .
या देखण्या रानभाजी महोत्सवाच्या यशस्वी आयोजनाबद्दल पालकमंत्री श्री आबिटकरांनी , विभागीय सह संचालक बसवराज मास्तोळी आणि आत्माचे प्रकल्प संचालक जालिंदर पांगरे यांचे विशेष कौतुक केले . यावेळी संदीप देसाई ,अरुण भिंगारदिवे ,संतोष पाटील , डॉ गणेश मित्ते यांच्यासह उमेद , आत्मा आणि कृषि विभागाचे इतर अधिकारी – पदाधिकारी उपस्थित होते .