रयत शिक्षण संस्थेच्या बळवंत कॉलेज विटा येथे सामाजिक शास्त्रे विषय शिक्षकांसाठी गुणवत्तावाढ मार्गदर्शन कार्यशाळा उत्साहात

दर्पण न्यूज विटा /प्रतिनिधी :-
रयत शिक्षण संस्थेच्या बळवंत कॉलेज विटा येथे बुधवार दि. ०७ जानेवारी २०२६ रोजी कर्मवीर भाऊराव पाटील प्रवेश परीक्षा अकॅडमी अंतर्गत सामाजिक शास्त्रे विषय शिक्षकांसाठी एक दिवसीय कार्यशाळा उत्साहात संपन्न झाली. विद्यार्थ्यांचा शैक्षणिक, बौद्धिक ज्ञानात्मक विकास वृद्धिंगत करण्यासाठी आणि स्पर्धा परीक्षा विषयक गुणवत्ता अधिक सक्षम करण्यासाठी संस्थेत ज्युनिअर विभागाकडे कार्यरत असणाऱ्या शिक्षकांसाठी ही कार्यशाळा आयेजित करण्यात आली होती. संस्थेचे ऑडिट विभागाचे सहसचिव मा. डॉ राजेंद्र मोरे साहेब यांनी या कार्यशाळेचे उदघाटन केले. अध्यक्षस्थानी दक्षिण विभागाचे माजी चेअरमन मा. माधव दादा मोहिते होते. कार्यक्रमास महाविद्यालयाचे प्रभारी प्राचार्य डॉ. चंद्रकांत बोबडे, प्रा. संदीप भुजबळ, पर्यवेक्षक प्रा. सर्जेराव सावंत, डॉ. शंकर शेंडगे, प्रा. नितीन जगताप आदि मान्यवर उपस्थित होते.
उपस्थित प्रशिक्षणार्थी शिक्षकांना मार्गदर्शन मार्गदर्शन करताना डॉ. मोरे साहेब म्हणाले, ‘कर्मवीर भाऊराव पाटील यांनी विद्यार्थी-केंद्रित व स्वावलंबी शिक्षणावर भर दिला. शिवाय गोरगरिबांची पोरं शिकावित यासाठी त्यांची कायम धडपड होती. बदलत्या काळानुसार शिक्षणातील बदल, आव्हाने याचा विचार करून रयत शिक्षण संस्था पुढे पाऊल टाकते आहे. याचेच द्योतक म्हणून आजची ही कार्यशाळा आहे. संस्थात्मक विकास कार्यशाळांमधून शिक्षकांना प्रभावी मार्गदर्शन, योग्य दिशा, प्रेरणा देणे हा सदर कार्यशाळेचा मुख्य उद्देश असल्याचे त्यांनी सांगितले. यावेळी विभागीय अधिकारी मा. अशोक शिंदे यांनीही आपले मनोगत व्यक्त केले.
या कार्यशाळेत प्रा. दशरथ जाधव, प्रा. अजित साळुंखे, प्रा. पृथ्वीराज पाटील या तज्ज्ञ मार्गदर्शक शिक्षकांनी विषय अध्ययन, व्यवसायिक करिअर संधी, स्पर्धा परीक्षांचे बदलते स्वरूप यावर सखोल मार्गदर्शन केले.
सकाळी १०. ०० पासून सायंकाळी ५. ३० वाजेपर्यंत सुरु असलेल्या या कार्यशाळेत मध्य व दक्षिण विभागांतील तब्बल ११५ शिक्षकांनी सहभाग नोंदविला. कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रभारी प्राचार्य डॉ. चंद्रकांत बोबडे यांनी केले. सूत्रसंचालन प्रा. राम मुजमुले यांनी तर आभार प्रा. संताजी सावंत यांनी मानले. कार्यशाळा यशस्वीतेसाठी ज्युनिअर विभागातील सर्व सेवक व कर्मचारी यांनी विशेष परिश्रम घेतले.



