मुख्यमंत्री तीर्थ दर्शन योजनेच्या लाभार्थींची मंगळवारी निवड : जिल्हाधिकारी कार्यालयातील कार्यक्रमास उपस्थितीचे आवाहन

दर्पण न्यूज सांगली : मुख्यमंत्री तीर्थ दर्शन योजनेसाठी पात्र ठरलेल्या लाभार्थींच्या निवडीसाठी जिल्हाधिकारी कार्यालय सांगली येथे मंगळवार, दिनांक 20 मे 2025 रोजी सकाळी 10.30 वाजता लॉटरी पध्दतीने निवड करण्यात येणार आहे. या योजनेतून अर्ज सादर केलेल्या ज्येष्ठ नागरिकांनी तसेच सर्वसामान्य नागरिकांनी या कार्यक्रमास उपस्थित राहावे, असे आवाहन समाज कल्याण सांगली चे सहाय्यक आयुक्त मेघराज भाते यांनी प्रसिध्दीपत्रकाव्दारे केले आहे.
महाराष्ट्र राज्यातील 60 वर्षे व त्यापुढील वयाच्या ज्येष्ठ नागरिकांना देशातील मोठ्या तीर्थ स्थळांना जाऊन मन:शांती तसेच अध्यात्मिक पातळी गाठणे सुकर व्हावे यासाठी सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाची मुख्यमंत्री तीर्थ दर्शन योजना राबविण्यात येत आहे. या योजनेतून प्रति व्यक्ती 30 हजार रुपये खर्चाची कमाल मर्यादा असून यामध्ये प्रत्यक्ष प्रवास, भोजन, निवास इत्यादी बाबींचा समावेश असेल.
या योजनेतून पात्र प्रवाशांची निवड जिल्हास्तरीय समितीद्वारे करण्यात येईल. दि. 31 ऑक्टोबर 2024 पर्यंत सांगली जिल्ह्यासाठी कमाल एक हजार पात्र लाभार्थींचा कोटा निश्चित करण्यात आलेला असून विहित केलेल्या तीर्थक्षेत्रांमधून तीर्थदर्शन यात्रा निश्चित करण्याचे अधिकार हे जिल्हास्तरीय समितीला आहेत.
या योजनेतून लाभ घेण्यासाठी सांगली जिल्ह्याकरिता विहित कोट्यापेक्षा अधिक संख्येने अर्ज प्राप्त झाल्याने लॉटरी पध्दतीने लाभार्थींची निवड केली जाईल, असे प्रसिध्दी पत्रकात म्हटले आहे.