शिक्षण क्षेत्रात भारतीय ज्ञानाची मोठी परंपरा ; माजी कुलगुरु डॉ.माणिकराव साळुंखे
विविध क्षेत्रातील उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या वाचक सभासद, विविध गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार ; उद्योजक गिरीश चितळे यांची उपस्थिती

दर्पण न्यूज भिलवडी :-
शिक्षण क्षेत्रात भारतीय ज्ञानाची परंपरा मोठी आहे.देशातील शिक्षण सार्वजनिक झाले म्हणून खऱ्या अर्थाने देशाचा विकास झाला आहे.धर्म आणि राजकारण यापासून शिक्षण व्यवस्था दूर ठेवल्यास देशाचा विकास होईल असे प्रतिपादन प्रतिपादन शिवाजी विद्यापीठाचे माजी कुलगुरु डॉ.माणिकराव साळुंखे यांनी केले.भिलवडी सार्वजनिक वाचनालयाच्या ८५ व्या वर्धापन दिनानिमित्त आयोजित व्याख्यामालेत ‘ महाराष्ट्रातील शिक्षण एक चिंतन ‘ या विषयांवरील व्याख्यान प्रसंगी ते बोलत होते.अध्यक्षस्थानी वाचनालयाचे अध्यक्ष गिरीश चितळे होते.
ग्रामीण भागातील वाचनालयाचे सर्वाधिक वाचक सभासद बनवून वाचन चळवळ वृध्दींगत करण्यासाठी विविध उपक्रम राबविणार असल्याचे प्रतिपादन गिरीश चितळे यांनी केले.
मान्यवरांच्या हस्ते सदानंद साहित्य मंडळ औदुंबरचे कार्यवाह पुरुषोत्तम जोशी यांना सर्वोत्कृष्ट ग्रंथोपासक पुरस्कार प्रदान करण्यात आला. कार्यवाह सुभाष कवडे यांनी त्यांना मिळालेल्या विविध साहित्य विषयक उपक्रमातून व पुरस्कारातून मिळालेली रक्कम पंचवीस हजार रुपये भिलवडी सार्वजनिक वाचनालयास देणगी म्हणून दिली.गायत्री चितळे,मुख्याध्यापक मुकुंद जोग,डॉ.सुमित साळुंखे,लेखक महादेव माने,श्रीधर मोरे,पूजा भिसे या विविध क्षेत्रातील उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या वाचक सभासद यांच्यासह विविध गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला.
प्रस्ताविक व स्वागत उपाध्यक्ष डी.आर.कदम यांनी केले.कार्यवाह सुभाष कवडे यांनी पाहुण्यांचा परिचय केला.
सौ.मयुरी नलवडे यांनी सूत्रसंचालन केले. हणमंत डिसले यांनी आभार मानले.
यावेळी जी.जी.पाटील,जयंत केळकर,जे.बी.चौगुले,महावीर वठारे, ए.के.चौगुले,महावीर चौगुले,प्रा.महेश पाटील,सतपाल साळुंखे, सतिश पाटील आदींसह,वाचक सभासद उपस्थित होते.