देश विदेशमाहिती व तंत्रज्ञान

गोवा येथे भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात (IFFI)फिल्म बाजारला सुरुवात

नवोदित चित्रपट निर्मात्यांची सर्जनशील आवड अनुभवायची": शेखर कपूर

 

गोवा (अभिजीत रांजणे) :-

55 व्या आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात (इफ्फी-IFFI) आज फिल्म बाजार या दक्षिण आशियातील प्रमुख चित्रपट बाजारपेठेच्या 18व्या आवृत्तीचे जोशात उद्घाटन झाले.   IFFI चा एक महत्त्वाचा भाग असलेला फिल्म बाजार, उगवते चित्रपट निर्माते आणि प्रस्थापित व्यावसायिक उद्योजक  यांच्यात समन्वय साधून  सहयोग निर्माण करण्यासाठी आणि चित्रपटाच्या उज्वल भवितव्याला चालना देण्यासाठी धडाडीचे क्रियाशील व्यासपीठ उपलब्ध करून देण्याची हमी देतो.

माहिती आणि प्रसारण मंत्रालयाचे सचिव संजय जाजू यांनी IFFI येथे फिल्म बाजाराचे उद्घाटन करताना, नोंदणीची विक्रमी संख्या (1500 हून अधिक) आणि 10 हून अधिक देश-विशिष्ट दालनांची  उपस्थिती अधोरेखित केली.  “उगवत्या चित्रपट निर्मात्यांना खतपाणी घालण्यासाठी हे एक अनोखे व्यासपीठ आहे. कल्पना सादर करण्यापासून ते चित्रपट निर्मितीचा सौदा निश्चित होईपर्यंत, उद्योगातील सर्व स्तरांवरील उत्पादकतेला, फिल्म बाजार चालना देतो,” असे ते म्हणाले.

तरुण कलागुणांना वाव देण्याच्या इफ्फीच्या वचनबद्धतेबद्दल त्यांनी पुढे विस्ताराने सांगितले.  “या वर्षीचा क्रिएटिव्ह माइंड्स ऑफ टुमारो (CMOT) हा उद्याचे सर्जनशील निर्माते ठरवणारा कार्यक्रम, चित्रपट निर्मितीतील भारतातील सर्वात हुशार तरुण कलागुणांना शोधून त्यांना खतपाणी घालणारा एक दीपस्तंभ आहे. हा कार्यक्रम 100 होतकरु प्रतिभावंतांचे  स्वागत करत, त्यांच्यामधील कलागुणांना लक्षणीय वाव देतो”, असे ते पुढे म्हणाले.

फिल्म बाजार हे एक मनोरंजक व्यासपीठ असून, या मंचावर तरुण चित्रपट निर्माते त्यांच्या कल्पना आणि निर्मिती उत्कटतेने सादर करतात, अशा शब्दात 55 व्या ‘इफ्फी’ महोत्सवाचे संचालक शेखर कपूर यांनी फिल्म बाजार चे वर्णन केले. “फिल्म बाजार’’ मधून  तरुण चित्रपट निर्मात्यांचा  उत्साह, उर्जा आणि त्यांचे काम   उत्कटतेने दिसून येते. इथे येऊन ती उत्कटता मला खऱ्या अर्थाने अनुभवायची आहे”, असे मनोगत, या ख्‍यातकीर्त प्रसिद्ध चित्रपट निर्मात्याने व्यक्त केले.

माहिती आणि प्रसारण मंत्रालयाचे सहसचिव आणि एनएफडीसीचे व्यवस्थापकीस संचालक प्रिथुल कुमार यांनी ऑनलाइन फिल्म बाजार उपक्रम सुरू करण्याची घोषणा केली. ते म्हणाले, नाविन्यपूर्ण व्यासपीठ, जागतिक खरेदीदार आणि विक्रेते यांना जोडण्यासाठी, तसेच वैविध्‍यपूर्ण कल्पनांची देवाणघेवाण करण्यासाठी आणि सिनेमा हा व्यवसाय म्हणून अधिकाधिक पुढे नेण्यासाठी एक आभासी केंद्र म्हणून काम करीत आहे.

माहिती आणि प्रसारण मंत्रालयाच्या (चित्रपट) सहसचिव वृंदा मनोहर देसाई यांनी सह-उत्पादनाला असलेल्या बाजारपेठेविषयीचा तपशील उलगडून सांगितला. यंदा यामध्ये सात देशांतील 21 फीचर फिल्म्स आणि 8 वेब सिरीज आहेत. वितरण आणि निधी शोधणाऱ्या चित्रपट निर्मात्यांसाठी एक महत्त्वाचा स्त्रोत असलेल्या ‘व्ह्यूइंग रूम’ वर प्रकाश टाकताना,  वृंदा देसाई यांनी सांगितले की, या वर्षी 208 चित्रपट पाहण्यासाठी उपलब्ध असणार आहेत. त्यामध्‍ये फीचर फिल्म, मध्यम लांबी आणि लहान स्वरूपातील चित्रपटांचा समावेश  आहे.

या कार्यक्रमाला अनेक दिग्गज मान्यवर उपस्थित होते. त्यामध्‍ये फिल्म बाजारचे सल्लागार जेरोम पेलार्ड आणि भारतातील ऑस्ट्रेलियाचे उपउच्चायुक्त निकोलस मॅककॅफ्रे यांचा समावेश होता.

 

फिल्म बाजार 2024: 

दक्षिण आशियातील सर्वात मोठा चित्रपट बाजार: यंदाची फिल्म बाजारची 18 वी आवृत्ती ही आतापर्यंतची सर्वात मोठी आवृत्ती आहे , ज्यात 350हून अधिक वैशिष्ट्यपूर्ण चित्रपट विविध विभागांतून प्रदर्शनासाठी सज्ज आहेत2007 मध्ये त्याची स्थापना झाल्यापासून, फिल्म बाजार हा दक्षिण आशियातील सर्वात मोठा आणि सर्वात आवश्यक चित्रपट बाजार बनला आहे. फिल्म बझार दक्षिण आशिया प्रांतात जागतिक सिनेमांच्या विक्रीची सुविधा  देखील उपलब्ध करून देतो तसेच दक्षिण आशियाई आणि आंतरराष्ट्रीय चित्रपट निर्माते, निर्माते, सेल्स  एजंट आणि सर्जनशील आणि वित्तीय सहकार्याच्या शोधात असलेले महोत्सव संचालक यांना एकत्र आणण्याचे देखील काम करतो. पाच दिवसांमध्ये, फिल्म बझार  दक्षिण आशियातील आशय सामग्री आणि प्रतिभेला प्रोत्साहन देण्यावर भर देईल. विविध जागतिक कथानकांना प्रकाशझोतात आणणे हे सह -निर्मितीचे उद्दिष्ट आहे.

 

Share

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!