सांगली पॅटर्न हुंडामुक्ती अभियान पहिल्या टप्प्यात आज कुटुंबांचा सत्कार
लग्नात हुंडा घेतला नसल्याबाबतची 1167 प्रतिज्ञापत्र प्राप्त

दर्पण न्यूज मिरज/सांगली : “हुंडा घ्यायचा नाही व हुंडा द्यायचा नाही” हा विचार समाजात रुजविण्यासाठी सांगली जिल्ह्यात जिल्हाधिकारी अशोक काकडे यांच्या संकल्पनेतून सांगली पॅटर्न हुंडामुक्ती अभियान राबविण्यात येत आहे. या उपक्रमांतर्गत ज्या कुटुंबामध्ये हुंडा दिला नाही अथवा घेतला नाही अशा कुटुंबांचा सत्कार जागतिक महिला दिनी 8 मार्च रोजी संबंधित अंगणवाडी स्तरावर करण्यात येणार आहे. जिल्ह्यामध्ये लग्नात हुंडा घेतला किंवा दिला नसल्याबाबतचे एकूण 1167 प्रतिज्ञापत्र प्राप्त झालेले आहेत. ही माहिती महिला व बालविकास अधिकारी वर्षा पाटील यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे दिली आहे.
प्रसिद्धीपत्रकात म्हटले आहे कि, हुंडामुक्ती अभियान अंतर्गत हुंडा प्रतिबंधक कायदा, 1961 अन्वये हुंडा प्रथेच्या विरोधात जनजागृती करण्यात येत आहे. महिला व बालविकास विभाग यांच्यावतीने ‘सांगली पॅटर्न हुंडामुक्ती अभियान – टप्पा १ ’ या उपक्रमांतर्गत जिल्ह्यातील प्रकल्पनिहाय सर्व अंगणवाडी सेविका यांच्यामार्फत हुंडा न घेता विवाह केलेल्या जोडप्यांची माहिती घेवून त्यांच्याकडून या अभियानात समाविष्ठ होण्यासाठी प्रतिज्ञापत्र घेवून त्यांना प्रमाणपत्र देण्यात येणार आहे. या अभियानांतर्गत महिला व बालविकास विभागाकडील अंगणवाडी सेविका यांच्यामार्फत लग्नावेळी लग्नातील दोन्ही पालकांकडून हुंडा न घेतल्याबाबतचे प्रतिज्ञापत्र घेवून अशा जोडप्यांचा सत्कार संबंधीत अंगणवाडी स्तरावर दिनांक ८ मार्च (जागतिक महिला दिनी) रोजी करण्यात येणार आहे. त्यानुसार सांगली जिल्ह्यामध्ये लग्नात हुंडा न घेतल्याबाबतचे एकूण 1167 प्रतिज्ञापत्र प्राप्त झालेले आहे. महिला व बाल विकास विभागामार्फत सर्व जोडप्यांचा सत्कार प्रमाणपत्र देवून करण्यात येणार आहे.
तसेच जिल्ह्यातील प्रकल्पनिहाय ज्या अंगणवाडी सेविकांनी सर्वात जास्त प्रतिज्ञापत्र सादर केलेली आहेत अशा एकूण 36 अंगणवाडी सेविकांचा सत्कार जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये करण्यात येणार आहे.
या उपक्रमामुळे हुंडा प्रतिबंधक कायदा, १९६१ (Dowry Prohibition Act, 1961) बाबत सर्वसामान्यांमध्ये जनजागृती होण्यास मदत होणार असल्याचे प्रसिध्दी पत्रकात म्हटले आहे.



