मतदानपूर्व व मतदानाच्या दिवशी मुद्रित माध्यमांतील राजकीय जाहिरातींचे पूर्वप्रमाणन बंधनकारक
विधानसभा सार्वत्रिक निवडणूक-2024

सांगली : मा. भारत निवडणूक आयोगाच्या दि. 7 नोव्हेंबर 2024 रोजीच्या पत्रानुसार महाराष्ट्र विधानसभा सार्वत्रिक निवडणूक 2024 साठी मतदानाच्या दिवशी म्हणजेच दिनांक 20 नोव्हेंबर 2024 आणि मतदानाच्या एक दिवस आधी म्हणजे दिनांक 19 नोव्हेंबर 2024 रोजी मुद्रित माध्यमात प्रसिद्ध करावयाच्या राजकीय जाहिरातींचे पूर्वप्रमाणन करणे बंधनकारक आहे. त्यामुळे विधानसभा निवडणूकसाठी कोणताही राजकीय पक्ष, निवडणूक लढविणारा उमेदवार, इतर कोणतीही संस्था किंवा व्यक्ती यांनी वरीलप्रमाणे राजकीय जाहिरातींचे पूर्वप्रमाणिकरण करून घ्यावे, असे जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी डॉ. राजा दयानिधी यांनी कळविले आहे. वृत्तपत्रांनीही प्रमाणित जाहिरातीच प्रसिद्ध करण्याची दक्षता घ्यावी, असेही त्यांनी स्पष्ट केले आहे.
अर्जदारांनी सदर जाहिरात प्रकाशित करण्याच्या प्रस्तावित तारखेच्या दोन दिवस आधी जिल्हा माध्यम प्रमाणन व संनियंत्रण समितीकडे अर्ज सादर करावेत. अधिक माहितीसाठी जिल्हा माध्यम प्रमाणन व संनियंत्रण समिती, जिल्हा माहिती कार्यालय, तळमजला, मध्यवर्ती प्रशासकीय इमारत, जिल्हाधिकारी कार्यालय परिसर, सांगली येथे संपर्क करावा.