मोहिते वडगाव, अंबक येथे काँग्रेस पक्षाचे उमेदवार डॉ विश्वजीत कदम यांचा प्रचार, लोकांशी संवाद
महापूर, कोरोना काळात डॉ विश्वजीत कदम यांची तळमळीने सेवा : युवा नेते सतीश आबा पाटील

कडेगांव (मुख्य संपादक अभिजीत रांजणे):—
पलूस कडेगाव विधानसभा मतदारसंघाचे काँग्रेस पक्षाचे उमेदवार डॉ विश्वजीत कदम यांनी विधानसभा निवडणूक प्रचारार्थ मोहिते वडगाव व अंबक (ता. कडेगाव) येथे भेट दिली तसेच ग्रामस्थ व कार्यकर्त्यांशी संवाद साधला.यावेळी डॉ विश्वजीत कदम यांनी सांगितले की, गेल्या सहा वर्षांत पलूस-कडेगाव मतदारसंघासाठी मोठ्या प्रमाणात निधी आणून प्रत्येक गावात अनेक विकासाची कामे केली आहेत. मतदार संघातील लोकांच्या सेवेसाठी तत्पर राहणार असून जनतेचा उत्स्फूर्त पाठिंबा मिळत आहे .
येत्या २० नोव्हेंबरला ‘हाताचा पंजा’ या चिन्हासमोरील बटन दाबून मला प्रचंड मताधिक्याने विजयी करून सेवेची पुन्हा एकदा संधी द्या, असे आवाहन ही डॉ विश्वजीत कदम यांनी लोकांना केले.
या कार्यक्रमा प्रसंगी युवा नेते सतीश आबा पाटील यांनी सांगितले की, नेहमीच कदम कुटुंबातील सदस्यांनी सामान्य माणसांचे हित जोपासले आहे. स्व पतंगराव कदम यांनी भारती विद्यापीठ माध्यमातून गरिब विद्यार्थ्यांना शिक्षण दिले. लोकांना नोकरी दिली. भारती व्हाॅस्पिटलच्या माध्यमातून लोकांची सेवा केली. यांचा वारसा घेऊन डॉ विश्वजीत कदम यांनी पलूस कडेगाव मतदार संघाचा विकास केला आहे. पलूस तालुक्यातील नदी काठच्या भागाला महापूर मोठं संकट आले होते, मात्र, या संकटामध्ये डॉ विश्वजीत कदम यांनी जीवाचे रान करून, पायाला जखम झाली होती पण याची पर्वा न करता,घरदार सोडून लोकांची तळमळीने सेवा केली. ही तळमळ नदीकाठची लोक कधीही विसरणार नाहीत. आपल्या गावाला सहकार्य करणार, आपण त्यांना भरघोस मतांनी निवडून देऊया, असे सतीश आबा पाटील म्हणाले.
माता-भगिनी व ग्रामस्थांनी जोरदार स्वागत करून आशीर्वाद दिले. यावेळी काँग्रेसचे पदाधिकारी, कार्यकर्ते, महिला ,ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.