पुणे येथे काकासाहेब चितळे सहवेदनेतून समृद्धीकडे पुस्तकाचे प्रकाशन

दर्पण न्यूज पुणे :-वसुंधरा काशीकर लिखित ‘काकासाहेब चितळे-सहवेदनेतून समृद्धीकडे’ या पुस्तकाचा प्रकाशन सोहळा आदित्य प्रतिष्ठानचे संस्थापक/अध्यक्ष विद्यावाचस्पती शंकर अभ्यंकर यांच्या हस्ते व अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाचे अध्यक्ष प्रा.मिलिंद जोशी यांच्या प्रमुख उपस्थितीत गणेश हॉल टिळक रोड पुणे येथे उत्साहात संपन्न झाला.
काळाबरोबर नव्हे तर काळपुढे चालण्याची दूरदृष्टी ही चितळे परिवाराची ख्याती आहे. दूरदृष्टीचा मनुष्य व्यवसाया बरोबरच समाज परिवर्तन घडविण्यासाठी निर्लेपपणे कार्य करू शकतो हे काकासाहेब चितळे यांच्या प्रेरणादायी व्यक्तिमत्त्वातून समजते.मनुष्य स्वतः कर्म करण्यासाठी मैदानात उतरला आणि ते निष्काम आहे हे ज्यावेळी समाजाला कळते त्याचवेळी समाज त्याच्या पाठीशी राहतो.काकासाहेब चितळे हे खरे कर्मयोगी होते ज्यांनी गीतेत सांगितलेला कर्मवाद सत्यात आणला असे प्रतिपादन विद्यावाचस्पती डॉ.शंकर अभ्यंकर यांनी केले.
यापुढे बोलताना, शंकर अभ्यंकर म्हणाले की, सचोटीने आणि गुणवत्तेच्या ध्यासाने व्यवसाय केल्यास मराठी माणूस व्यवसायात यशस्वी होतोच हा नवा इतिहास चितळे परिवाराने निर्माण केला.काकासाहेब चितळे यांचा संपूर्ण जीवनप्रवास संतांच्या आदर्शा इतकाच प्रेरणादायी आहे.काकासाहेब चितळे – सहवेदनेतून समृद्धीकडे हे पुस्तक वाचून आचरणात आणावे असे आहे.
प्रा.मिलिंद जोशी म्हणाले की,उत्तम चरित्रे समजासमोर आणली तर उत्तम चारित्र्य निर्माण होतात.आपल्या वैयक्तिक आयुष्या इतकंच लोकांचं आयुष्य संपन्न व समृद्ध करण्यासाठी काकासाहेब चितळे यांनी दिलेलं योगदान महत्वपूर्ण असे आहे. काकासाहेब चितळे खऱ्या अर्थाने उद्योजकांचेआयडॉल होत.चितळे ही जागतिक उद्योग विश्वातील ठसठशीत नाममुद्रा आहे.उद्याच्या भविष्यासाठी मराठी उद्योजकांची चरित्रे लिहिली जावीत.वसुंधरा काशीकर यांनी काकासाहेब चितळे यांचे चरित्र हे मराठी भाषेच्या समृद्धीच्या दृष्टीने पडलेले पाऊल आहे.
यावेळी पुस्तक निर्मितीची संकल्पना विषद करताना गिरीश चितळे म्हणाले की,काकासाहेब म्हणजे आमचे वडील,उद्योजक,समाजासाठी झटणारे व्यक्तिमत्व अशी त्यांची ओळख होती. त्यांच्या निधनानंतर लोकांनी सांगितलेल्या आठवणीतून ते समाजासाठी एक संप्रेरक असल्याचे जाणवू लागले. काकासाहेब जगलेली जीवन मूल्ये, चितळे समूहाचे संस्थापक बाबासाहेब चितळे यांचे विचार कृतीतून आचरणात आणलेला तो प्रवास पुढील पिढीसाठी प्रेरणादायी असा आहे.
साहित्यिक सुभाष कवडे, लेखिका वसुंधरा काशीकर यांनी मनोगत व्यक्त केले.
लेखिका वसुंधरा काशीकर यांचा तसेच पुस्तक प्रकाशन व संपादनासाठी योगदान देणारे आशुतोष रामगीर,दिपाली चौधरी, अनंत खासबारदार यांचा मान्यवरांचे हस्ते सत्कार करण्यात आला.
अनुष्का साने,नुपूर देसाई, सौम्या कोटणीस यांच्या शारदास्तवन स्त्रोत्राने कार्यक्रमाची सुरुवात झाली.
सकाळ प्रकाशनचे आशुतोष रामगीर यांनी प्रास्ताविक केले.विघ्नेश जोशी यांनी सूत्रसंचालन केले.काकासाहेब चितळे फाऊंडेशनच्या वतीने मान्यवरांचा सत्कार करण्यात आला.
यावेळी श्रीमती सुनिता चितळे,श्रीपाद चितळे,श्रीकृष्ण चितळे,विश्वास चितळे,अनंत चितळे,मकरंद चितळे,शेखर सहस्रबुध्दे,वीणा सहस्रबुध्दे,लीना चितळे,भक्ती चितळे, आ.डॉ.विश्वजीत कदम, संग्रामसिंह देशमुख,सौ.अपर्णा अभ्यंकर, माजी साखर आयुक्त शेखर गायकवाड, अमरसिंह देशमुख,राहुल सोलापूरकर, प्रा.विसुभाऊ बापट आदीं मान्यवरांसह काकासाहेब चितळे यांच्यावर प्रेम करणारे राज्यभरातून आलेले विविध क्षेत्रातील मान्यवर,वाचक बहुसंख्येने उपस्थित होते.