उत्पादन वाढीसाठी चितळे डेअरी राबवित असलेले उपक्रम महत्वपूर्ण : केंद्रीय मंत्री गिरिराजसिंह ;
भिलवडी स्टेशन येथे साधला शेतकऱ्यांशी संवाद

दर्पण न्यूज भिलवडी वार्ताहर :
आजकाल पिकाऊ जमिनीचे क्षेत्र कमी होत आहे तर दुसरीकडे दुध व अन्न धान्याची गरज वाढली आहे. देशाचा आर्थिक विकास साधायचा असेल तर गावातील शेतकरी प्रगतशील झाला पाहिजे.शेतीला दुग्ध उद्योगाची जोड देऊन आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून कमीत कमी खर्चात उत्पादन वाढीसाठी चितळे डेअरी राबवित असलेले विविध उपक्रम हे महत्वपूर्ण असल्याचे प्रतिपादन केंद्रीय वस्त्रोद्योग मंत्री गिरिराज सिंह यांनी केले.
भिलवडीस्टेशन येथील चितळे जीनस एबीस ग्लोबल,चितळे फूड्स,मे.बी.जी.चितळे डेअरीस भेट देऊन सुरू असलेल्या कामकाजाची माहिती घेतली.
यापुढे बोलताना ते म्हणाले की,१९४७ साली देशाला स्वातंत्र्य मिळाले.२०४७ मध्ये आपण स्वातंत्र्याची शताब्दी साजरी करणार आहोत.त्यावेळी भारत देश जगातील सर्वाधिक समृध्द असा देश असेल.त्याची सुरुवात गावागावातून करावी लागेल.गाव समृध्द बनायचे असेल शेतकरी समृध्द झाला पाहिजे.त्यासाठी कमीत कमी उत्पादन खर्चात जास्तीत उत्पादन घेण्यासाठी नियोजनपूर्वक योजना आखून त्या अंमलात आणणे आवश्यक आहे.
यावेळी दुध उत्पादक शेतकऱ्यांशी त्यांनी संवाद साधत गिरीराजसिंह यांनी गाई म्हैशीच ,संगोपन तिच्यापासून मिळणारे दुग्ध उत्पादन,शेतकऱ्यास होणारा फायदा,येणाऱ्या विविध अडचणी यासंदर्भात शेतकऱ्यांशी संवाद साधून सविस्तर चर्चा केली.त्यांनी स्वतः केलेल्या विविध प्रयोगविषयी माहिती दिली.चितळे डेअरीचे संचालक विश्वास चितळे यांनी प्रास्ताविक व स्वागत करून,चितळे डेअरीच्या वतीने शेतकऱ्यांसाठी आयोजित केलेल्या उदय,किरण,भास्कर या प्रशिक्षण कार्यक्रमाविषयी सविस्तर माहिती दिली. बिहार विधानसभेचे आमदार सर्वेश कुमार,माजी खासदार संजयकाका पाटील,श्रीपाद चितळे,अनंत चितळे,मकरंद चितळे,निखिल चितळे,अतुल चितळे,पुष्कर चितळे आदी उपस्थित होते.पशुसंवर्धन अधिकारी डॉ.एच.आर.इंगळे, डॉ.सी. व्ही.कुलकर्णी यांनी सूत्रसंचालन केले.चितळे डेअरीच्या कार्य क्षेत्रातील विविध गावातील उत्पादक शेतकरी बंधू -भगिनी,कामगारवर्ग उपस्थित होता.