
सांगली, : सांगली जिल्ह्यातील सर्व विधानसभा मतदार संघांमध्ये विधानसभा सार्वत्रिक निवडणूक २०२४ च्या अनुषंगाने मा. भारत निवडणूक आयोगाच्या निर्देशाप्रमाणे आदर्श आचारसंहितेचे तंतोतंत पालन करावे, अशा सूचना पुणे विभागीय आयुक्त कार्यालयाच्या उपायुक्त वर्षा लढ्ढा-उंटवाल यांनी आज दिल्या.
विधानसभा सार्वत्रिक निवडणूक २०२४ च्या अनुषंगाने जिल्ह्यात आदर्श आचारसंहितेच्या अनुषंगाने करण्यात येत असलेल्या कार्यवाहीचा आढावा त्यांनी घेतला. यावेळी निवासी उपजिल्हाधिकारी ज्योती पाटील, उपजिल्हा निवडणूक अधिकारी नीता शिंदे, जिल्हा उपनिबंधक मंगेश सुरवसे आदि उपस्थित होते.
जिल्हाधिकारी कार्यालयात विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने स्थापन करण्यात आलेल्या आचारसंहिता कक्ष, माध्यम संनियंत्रण व जनसंपर्क कक्ष व सी-व्हीजील कक्षास भेट देऊन त्यांनीं कामकाजाची माहिती घेतली. यावेळी निवासी उपजिल्हाधिकारी ज्योती पाटील यांनी आचारसंहिता कक्षाची माहिती दिली. जिल्हा माहिती अधिकारी संप्रदा बीडकर यांनी माध्यम कक्ष कामकाज व माध्यम प्रमाणिकरण व संनियंत्रण समितीच्या कामकाजाची माहिती दिली. जिल्हा उपनिबंधक मंगेश सुरवसे यांनी सी-व्हीजील कक्षात सुरु असलेल्या कामकाजाची माहिती दिली.
-
माध्यम कक्षात सहा दूरचित्रवाणी संचांच्या माध्यमातून वृत्तवाहिन्यांतील निवडणूक प्रचार, जाहिरात, पेड न्यूज आदींच्या अनुषंगाने संनियंत्रण केले जात आहे. तसेच वृत्तपत्रातील बातम्या, मजकूर, तसेच सोशल मीडियावरील पोस्टबाबतही काटेकोर लक्ष ठेवण्यात येत असल्याचे श्रीमती बीडकर यांनी यावेळी सांगितले. यावेळी श्रीमती वर्षा लढ्ढा-उंटवाल यांनी सुरु असलेल्या निवडणूक कामकाजाबाबत समाधान व्यक्त केले.