सीमा भागात अंमली पदार्थाची लागवड, विक्री, वाहतूक, साठवणूक होणार नाही, याची दक्षता घ्यावी
एनकॉर्ड समितीची बैठक संपन्न

सांगली : विधानसभा निवडणूक 2024 च्या अनुषंगाने सांगली जिल्ह्यातील सीमा भागावर लक्ष केंद्रित करून अंमली पदार्थाची लागवड, विक्री, वाहतूक व साठवणूक होणार नाही, याबाबत जिल्हास्तरीय एनकॉर्ड समितीमधील सर्व विभागांनी दक्ष राहावे. तसेच, एम.आय.डी.सी. आणि जिल्हा उद्योग केंद्र यांच्या अख्यतारीत असणाऱ्या सर्व प्रकारच्या बंद कंपन्या, कारखाने यांची माहिती समितीस सादर करावी, असे आदेश जिल्हाधिकारी तथा जिल्हा दंडाधिकारी डॉ. राजा दयानिधी यांनी आज येथे दिले.
जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात झालेल्या एनकॉर्ड समितीची बैठकीच्या अध्यक्षस्थानावरून ते बोलत होते. यावेळी पोलीस अधीक्षक संदीप घुगे, वन विभागाचे सहाय्यक वनसंरक्षक डॉ. अजित साजणे, एमआयडीसीच्या प्रादेशिक अधिकारी वसुंधरा जाधव, राज्य उत्पादन शुल्क विभागाचे अधीक्षक प्रदीप पोटे, आरोग्य विभागाचे मुजाहिद अलसानकर, डॉ. रवींद्र ताटे, समाजकल्याण विभागाचे एस. डी. भांबुरे आदि उपस्थित होते.
जिल्हाधिकारी तथा जिल्हा दंडाधिकारी डॉ. राजा दयानिधी म्हणाले, अंमली पदार्थाची लागवड, विक्री व सहभागासंदर्भात सखोल तपास करून वन विभाग व कृषि विभागाने कायदेशीर कारवाई करावी. जिल्ह्यातील सर्व औषध विक्रेत्यांना पत्र देऊन त्यांचे मेडिकल दुकानात सी.सी.टी.व्ही. कॅमेरे बसविल्याबाबतची माहिती औषध प्रशासनास सादर करण्यास कळवावे, असे ते म्हणाले.
डॉ. राजा दयानिधी म्हणाले, तपासणी दरम्यान भाडेतत्त्वावर देण्यात आलेल्या केमिकल कंपन्यांमध्ये काही आक्षेपार्ह आढळून आल्यास सदरच्या कंपनी मालकांवर कारवाई होणार असलेबाबत सदर कंपनी मालकांना प्रादेशिक अधिकारी, एम.आय.डी.सी., जिल्हा नियंत्रक, जिल्हा उद्योग केंद्र, सांगली व स्थानिक पोलीस ठाणे यांचेकडून सदर कंपनी मालकांना आजच्या बैठकीच्या अनुशंगाने नोटीस द्याव्यात, असे त्यांनी सूचित केले.