धाराशिव शहरातील कुत्र्यांचा कायमचा बंदोबस्त न केल्यास जिल्हाधिकारी व नगर परिषदेत कुत्रे सोडू ; शहर राष्ट्रवादी काँग्रेसचा इशारा

दर्पण न्यूज धाराशिव प्रतिनिधी संतोष खुने) :- धाराशिव शहरातील मोकाट व पिसाळलेल्या कुत्र्यांच्या वाढत्या संख्येमुळे नागरिक हैराण झाले असून लहान मुले व वृद्धांना बाहेर फिरणे धोक्याचे झाले आहे. या त्रासावर तातडीने आणि कायमस्वरूपी बंदोबस्त न झाल्यास, शहर राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार गट) तर्फे मोकाट कुत्री स्वखर्चाने पकडून जिल्हाधिकारी कार्यालय व नगर परिषदेत सोडण्याचा इशारा देण्यात आला आहे.
शहर राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष रणवीर इंगळे यांच्या नेतृत्वाखाली जिल्हाधिकाऱ्यांना सादर करण्यात आलेल्या निवेदनात नमूद केले आहे की, मागील तीन वर्षांपासून नगरपालिकेवर प्रशासक असल्याने सर्व कारभार मुख्याधिकाऱ्यांच्या अखत्यारीत आहे. या काळात शहरातील स्वच्छतेचा बोजवारा उडाल्यामुळे मोकाट व पिसाळलेल्या कुत्र्यांचा वावर झपाट्याने वाढला आहे. मागील वर्षी खाजा नगर भागात पिसाळलेल्या कुत्र्यांच्या हल्ल्यात एका व्यक्तीचा मृत्यू झाल्याची आठवणही निवेदनात करून देण्यात आली आहे.
याबाबत वेळोवेळी मुख्याधिकारी व मागील जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली बैठक घेऊनही ठोस कार्यवाही झालेली नसल्याचा आरोप करण्यात आला. आठवडाभरात मोकाट कुत्र्यांवर कारवाई करण्याचे आदेश नगरपालिकेला द्यावेत, अन्यथा कुत्रे थेट जिल्हाधिकारी कार्यालय व नगर परिषदेत सोडण्यात येतील आणि यामुळे कार्यालयीन कर्मचाऱ्यांना इजा झाली तर शासन जबाबदार राहील, असा इशारा देण्यात आला आहे.
निवेदनावर आयाज शेख, एजाज काझी, पृथ्वीराज चिलवंत, खलिफा कुरेशी, बाबा मुजावर, पंकज भोसले, धनंजय शहापूर, कुणाल कर्णवर, महादेव माळी, शाहनवाज सय्यद, जयंत देशमुख, सुरज वडवले, सरफराज कुरेशी, ज्योती माळाळे आदींच्या स्वाक्षऱ्या आहेत.