महाराष्ट्रमाहिती व तंत्रज्ञानसामाजिक

डिजीटल व्यवहार करताना सतर्क राहणे काळाची गरज : आशिष फुलुके

राष्ट्रीय ग्राहक दिनानिमित्त कार्यशाळा उत्साहात

 

दर्पण न्यूज सांगली-: आजचे युग हे ऑनलाईन युग आहे, त्याच्यामध्ये फसवणुकीचे प्रकारही वाढत आहेत. यासाठी कोणतीही वस्तू खरेदी करताना, डिजीटल व्यवहार करताना सतर्क राहणे अतिशय आवश्यक आहे आणि ही सतर्कता काळाची गरज असल्याचे प्रतिपादन प्रभारी जिल्हा पुरवठा अधिकारी आशिष फुलुके यांनी आज येथे केले.

जिल्हाधिकारी कार्यालय (पुरवठा शाखा) व लठ्ठे एज्युकेशन सोसायटी पॉलिटेक्निक सांगली यांच्या संयुक्त विद्यमाने राष्ट्रीय ग्राहक दिनानिमित्त आयोजित कार्यक्रम प्रसंगी ते बोलत होते. लठ्ठे एज्युकेशन सोसायटी पॉलिटेक्निक कॉलेज, कुपवाड एमआयडीसी येथे आयोजित या कार्यक्रमास सहाय्यक जिल्हा पुरवठा अधिकारी रूपाली सोळंके, प्राचार्य आण्णासाहेब गाजी, निवृत्त न्यायाधीश ॲड. फारूक कोतवाल, ॲड. ओमकार वांगीकर, ॲड. जयंत नवले, उपप्राचार्य राजेंद्र मेंच, ग्राहक संघटनेचे संजय कोरे, सर्जेराव पाटील, डॉ. ज्ञानचंद्र पाटील, मदन शहा आदि मान्यवर उपस्थित होते.

प्रभारी जिल्हा पुरवठा अधिकारी आशिष फुलुके म्हणाले, कोणतीही वस्तू खरेदी करताना त्याचे बिल घेऊनच पैसे द्यावेत. फसवणूक झाल्यास त्याची तात्काळ दाद मागावी आणि एक जागरूक नागरिक म्हणून आपले कर्तव्य पार पाडावे. ग्राहकांनी आपले हक्क सोडू नयेत. आपण एक ग्राहक म्हणून आर्थिक व्यवस्थेचा कणा आहोत. स्वतः जागरूक राहून इतरांनाही यामध्ये सहकार्य करूया, असे सांगून त्यांनी सर्वांना राष्ट्रीय ग्राहक दिनाच्या शुभेच्छा दिल्या.

  1. यावेळी प्रमुख वक्ते ॲड. ओमकार वांगीकर यांनी डिजीटल न्यायाद्वारे कार्यक्षम आणि लद निपटारा या विषयावर सविस्तर सादरीकरण करून मार्गदर्शन केले. फसवणूक झाल्यास ई दाखिल पोर्टलवरून ऑनलाईन घरबसल्या तक्रार कशी दाखल करता येते, त्यामुळे पैसा व वेळेची बचत होण्याबरोबरच लवकर न्याय मिळण्यास मदत होते. यासाठी डिजीटल गोष्टींचा वापर करावा, याबाबत त्यांनी सविस्तर मार्गदर्शन केले.

ॲड. फारूक कोतवाल, प्राचार्य आण्णासाहेब गाजी, ग्राहक संघटनेचे सर्जेराव पाटील यांनीही ग्राहकांचे अधिकार, कर्तव्ये याबाबत सविस्तर विवेचन करून कोणतेही व्यवहार करताना सजग राहण्याचे आवाहन करून फसवणूक झाल्यास तक्रार दाखल करण्यासाठी काय करावे याबाबत सविस्तर माहिती दिली.

प्रारंभी मान्यवरांच्या हस्ते दीप प्रज्वलन करण्यात आले. स्वागत व प्रास्ताविक सहाय्यक जिल्हा पुरवठा अधिकारी रूपाली सोळंके यांनी केले. सूत्रसंचालन प्रेमला खोत व दर्शनी पाटील यांनी केले. आभार पुरवठा निरीक्षक राजू कदम यांनी मानले. कार्यक्रमास विद्यार्थी, विद्यार्थिनी, ग्राहक संघटनेचे पदाधिकारी आदि उपस्थित होते

Share

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!