कृषी व व्यापारमहाराष्ट्र

महसूल आणि पशुसंवर्धन पंधरवड्यामध्ये  योजनांचा लाभ नागरिकांपर्यंत पोहोचवा : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

 

            मुंबई ; या वर्षीपासून महसूल सप्ताह ऐवजी ‘महसूल पंधरवडा’  तसेच ‘पशुसंवर्धन पंधरवडा’ आयोजित करण्यात आला आहे. या कालावधीत ‘शासन आपल्या दारी’ उपक्रमाच्या धर्तीवर शासनाच्या विविध योजना जास्तीत जास्त नागरिकांपर्यंत लाभ पोहोचवा. वयोश्री, लेक लाडकी, अन्नपूर्णा, ‘मुख्यमंत्री- माझी लाडकी बहीण’ तसेच शेतकऱ्यांशी संबंधित विविध योजनांची प्रभावी अंमलबजावणी करून शासनाची चांगली प्रतिमा निर्माण करावी, असे आवाहन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले.

            राज्यस्तरीय महसूल दिन तसेच महसूल व पशुसंवर्धन पंधरवडा-२०२४ चा आरंभ कार्यक्रम मंत्रालयातील परिषद सभागृह येथे मुख्यमंत्री श्री. शिंदे यांच्या हस्ते झाला. यावेळी   उपमुख्यमंत्री अजित पवार, महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील, महसूल आणि पशुसंवर्धन विभागाचे अपर मुख्य सचिव राजेशकुमार यांची प्रमुख उपस्थिती होती. तसेच दूरदृष्य संवाद प्रणालीद्वारे सर्व विभागीय आयुक्त , सर्व जिल्हाधिकारी आणि पशुसंवर्धन विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांची उपस्थिती होती.

            मुख्यमंत्री श्री.शिंदे म्हणाले, महसूल व पशुसंवर्धन पंधरवडा दोन्हीसाठी नागरिकांना शुभेच्छा देताना आनंद होत आहे. नागरिक व ग्रामीण भागातील जनतेसाठी महसूल व पशुसंवर्धन अतिशय महत्त्वाचे विभाग आहेत. महसूल पंधरवड्यामध्ये शासनाची प्रतिमा उंचावण्यासाठी महसूल विभागाने अग्रेसर राहून सर्व विभागांसह चांगले काम करावे.

     श्री.शिंदे म्हणाले की, कृषी, आरोग्य, सिंचन, जलसंपदा, सहकार यासह अन्य सर्व विभागांना एकत्र घेऊन काम करावे. अधिकाऱ्यांनी  अधिक गतीमान, परस्पर समन्वय साधून नागरिकांची कामे वेळेत करण्यासोबत शासनाच्या योजना जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहचवून लोकाभिमुख काम करावे. जिल्हास्तरीय, तालुकास्तरीय व ग्रामस्तरीय अधिकारी, कर्मचारी यांनी लोकांपर्यंत जावे.

            मुख्यमंत्री श्री.शिंदे म्हणाले की, पंधरवड्यानिमित्त विविध योजना लोकांपर्यंत नेऊन शासनाची चांगली प्रतिमा निर्माण करावी. भेसळ करणाऱ्यांना जरब बसेल यासाठी कडक कारवाई करावी.

महसूल विभागाने अधिक लोकाभिमुख होऊन काम करावे – उपमुख्यमंत्री

            उपमुख्यमंत्री श्री. पवार म्हणाले की, शासनाच्या विविध योजनांची अंमलबजावणी व उपक्रमामध्ये महसूल विभागाचे चांगले योगदान आहे. समाजातील प्रत्येक घटक यामध्ये सहभागी होत आहे. महसूल विभागाने लोकाभिमुख होत अधिक गतिमान पद्धतीने काम करावे. समाजातील शेवटच्या व्यक्तीपर्यंत पोहोचून सर्वांच्या एकत्रित प्रयत्नाने महसूल पंधरवडा यशस्वी होईल.  पोलीस विभागाच्या धर्तीवर महसूल विभागास देखील जिल्हा नियोजन समितीतून वाहने खरेदीचा निर्णय घेण्यात येत आहे, असे उपमुख्यमंत्री श्री. पवार यांनी सांगितले.

             संगणकीकरणामुळे शासकीय कार्यालयात येण्याची गरज कमी झाली आहे. ग्रामीण भागात महसूल व पशुसंवर्धन विभाग दोन्ही महत्त्वाचे आहेत. शेतकरी व दूध उत्पादक यासह सर्वसामान्यांची सेवा करण्याचे उद्दिष्ट ठेवून काम केले जावे असे उपमुख्यमंत्री श्री. पवार म्हणाले.

शासनाच्या योजना व धोरण पोहोचवावेत –महसूल मंत्री

            महसूलमंत्री श्री.विखे पाटील म्हणाले की, पंधरवड्याच्या उपक्रमामध्ये सर्व नागरिकांपर्यंत शासनाच्या योजना व धोरण पोहोचवावेत. उपक्रम राबवताना  पालकमंत्री, आमदार , लोकप्रतिनिधी यांच्या सहभागाने कार्यक्रमांचे आयोजन करण्यात यावे. विविध उपक्रमांच्या निमित्ताने सैनिकांचे कुटुंबीय, महाविद्यालयीन युवक, वयोवृद्ध नागरिक , महिला समाजातील विविध घटक यांना सामावून घेत महसूल पंधरवड्याचा हा उपक्रम यशस्वी करावा. पशुसंवर्धन पंधरवड्याच्या निमित्ताने राज्यातील दूध भेसळ विरोधात कारवाई केली जावी.

            प्रास्ताविकात अपर मुख्य सचिव राजेशकुमार यांनी महसूल पंधरवड्याच्या आयोजनाचे महत्व सांगून या उपक्रमाचा तपशीलवार माहिती दिली.

 

Share

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!