नवीन फौजदारी कायदे हे नागरिक स्नेही : कोल्हापूर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कार्तिकेयन एस यांचे प्रतिपादन
नव्या भारताचे नवीन कायदे” हे प्रदर्शन पाहण्याची कोल्हापूरवासियांना संधी

कोल्हापूर, ;-
नवीन फौजदारी कायद्याने जुन्या कायद्यांमध्ये असलेल्या छोट्या गुन्ह्यांसाठीच्या जाचक शिक्षा कमी केल्या असून त्यांना अधिक नागरिक स्नेही बनवले आहे असे प्रतिपादन कोल्हापूर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी तथा प्रशासक कार्तिकेयन एस. यांनी आज केले, केंद्रीय संचार ब्यूरो आणि जिल्हा परिषद यांच्या वतीने आयोजित नव्या भारताचे नवीन कायदे या नवीन फौजदारी कायद्यांची माहिती देणाऱ्या प्रदर्शनीच्या उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते. नवीन कायद्यांचा भर हा शिक्षेपेक्षा न्यायावर असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले. यावेळी जिल्हा परिषदेचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी अजयकुमार माने, केंद्रीय संचार ब्युरोचे अधिकारी महेश चोपडे, आणि इतर मान्यवर उपस्थित होते
भारत सरकारच्या माहिती आणि प्रसारण मंत्रालयाच्या केंद्रीय संचार ब्युरो आणि कोल्हापूर जिल्हा परिषद यांच्या संयुक्त विद्यमाने दिनांक 30, 31 जुलै आणि 1 ऑगस्ट 2024 या कालावधीत जिल्हा परिषद कोल्हापूर इथे या माहितीपर चित्र प्रदर्शनाचं आयोजन करण्यात आलं आहे.
यामध्ये नवीन फौजदारी कायद्यांची अंमलबजावणी, भारतीय न्याय संहिता, भारतीय नागरिक सुरक्षा संहिता, भारतीय साक्ष अधिनियम, नव्या कायद्यात अंतर्भूत केलेली नवीन कलमं आणि त्यांची कार्यपद्धती, ई-एफ आय आर, योग्य वेळेत न्याय, न्यायालयीन प्रक्रियेत तंत्रज्ञानाचा वापर, न्यायवैद्यक शास्त्राला प्रोत्साहन, साक्षीदारांचे संरक्षण, लहान मुलं आणि महिला सुरक्षा, अभियोजन संचालनालय आदी विषयांवरील माहिती मांडण्यात आली आहे.
भारतीय नागरिकांना सुरक्षा प्रदान करण्यासाठी कायद्यांमध्ये काळानुरूप बदल करून नवीन फौजदारी कायदे आणण्यात आले आहेत. नागरिकांना सुरक्षा देण्याचा प्रयत्न या कायद्याद्वारे सरकार करत आहे. गुन्हेगारांना जरब बसवण्यासाठी आणि नागरिकांना न्याय मिळवून देण्यासाठी या कायद्यांचा वापर होईल अशी खात्री आपल्याला वाटत असल्याचे सहाय्यक सरकारी वकील समीउल्ला पाटील यांनी यावेळी सांगितले
या कार्यक्रमात नवीन फौजदारी कायद्यासंदर्भात उपस्थित प्रेक्षकांसाठी प्रश्नमंजुषा स्पर्धा घेण्यात आली आणि विजेत्यांना प्रमाणपत्र आणि बक्षीस देऊन सन्मानित करण्यात आले. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक केंद्रीय संचार ब्युरोचे प्रमोद खंडागळे यांनी केले
या दोन दिवसीय प्रदर्शनामध्ये नवीन फौजदारी कायद्यामधील विविध तरतुदी, गैरसमज आणि वस्तुस्थिती आदींविषयी विस्तृत माहिती देणारी मांडणी करण्यात आली आहे. हे प्रदर्शन सकाळी 10 ते 5 वाजेपर्यंत सर्वांसाठी विनामूल्य बघता येणार आहे. तसेच क्यू आर कोड स्कॅन करून प्रदर्शनाची संपूर्ण माहिती मोबाईलवर मिळवता येणार आहे. कार्यक्रमाला सरकारी अधिकारी, कर्मचारी आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.