देश विदेश

54व्या इफ्फीचा अर्धा टप्पा पूर्ण: महोत्सवाचा मिडफेस्ट चित्रपट म्हणून उद्या “अबाउट ड्राय ग्रासेस” या तुर्की चित्रपटाचे प्रदर्शन होणार

गोवा/पणजी (अभिजीत रांजणे) :

 

गोवा येथे आयोजित 54 व्या इफ्फी अर्थात भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाचा मध्यावधी टप्पा उद्या पूर्ण होत आहे, त्यानिमित्त मिडफेस्ट चित्रपट म्हणून नुरी बिल्ज सेलन यांनी दिग्दर्शित केलेला “अबाउट ड्राय ग्रासेस” हा उत्कृष्ट तुर्की चित्रपट उद्या सादर करण्यात येणार आहे. रोचक कथाविषय आणि कलाकारांचे विलक्षण सादरीकरण यांसाठी प्रसिद्ध झालेल्या या चित्रपटाने आंतरराष्ट्रीय पातळीवर गौरव प्राप्त केला आहे. कान चित्रपट महोत्सव 2023 मध्ये या चित्रपटातील अभिनेत्रीला  सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कार मिळाला आहे.

“अबाउट ड्राय ग्रासेस” या चित्रपटाने कान्स चित्रपट महोत्सव 2023, टोरांटो आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव 2023, कार्लोव्ही वॅरी आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव 2023, बुसान आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव 2023 तसेच साओ पाऊलो आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव 2023 यांसह   जगभरातील इतर अनेक प्रतिष्ठित चित्रपट महोत्सवांमध्ये याआधीच आपला ठसा उमटवला आहे. या चित्रपटाची आकर्षक कथावस्तू जागतिक पातळीवरील प्रेक्षकांना भावली असून त्यामुळे चित्रपटीय क्षितिजावर हा चित्रपट ठळकपणे उठून दिसणारा झाला आहे.

“अबाउट ड्राय ग्रासेस” हा चित्रपट पणजी येथील आयनॉक्सच्या पडदा क्र.1 वर उद्या म्हणजे 24 नोव्हेंबर 2023 रोजी दुपारी साडेपाच वाजता प्रदर्शित करण्यात येईल. या सादरीकरणादरम्यान चित्रपटाचे कलाकार आणि इतर तंत्रज्ञ यांचा सत्कार करण्यात येणार आहे.

 

चित्रपटाच्या कथावस्तूची एक झलक

अनिवार्य कर्तव्य पार पाडल्यानंतर, एका छोट्याश्या गावाच्या हद्दीतून सुटका करून घेण्याच्या  एका तरुण शिक्षिकेच्या आकांक्षेभोवती या चित्रपटाची कथा फिरते. उदासवाण्या जीवनामुळे आलेल्या निराशेला तोंड देत असलेल्या मुख्य पात्राच्या दृष्टीकोनाला नुरे या सहकाऱ्याने दिलेल्या पाठींब्याने चित्रपटाला अनपेक्षित वळण मिळते.

दिग्दर्शक नुरी बिल्ज सेलन

इस्तंबूलमध्ये 1959 मध्ये जन्मलेल्या नुरी बिल्ज सेलन यांनी स्वतःला चित्रपट निर्मिती क्षेत्रातील प्रमुख व्यक्ती म्हणून प्रस्थापित केले आहे. फेस्टीव्हल द कान मध्ये प्रदर्शित करण्यात आलेल्या ‘कोझा’ या लघुपटाने त्यांचा दिग्दर्शकीय प्रवास सुरु झाला. वर्ष 1998 मध्ये भरलेल्या बर्लिन चित्रपट महोत्सवात त्यांच्या ‘कसाबा’ या चित्रपटाला मिळालेला कॅलिगारी पुरस्कार, वर्ष 2003 मध्ये कान येथे भरलेल्या महोत्सवात त्यांच्या ‘युझक’ या चित्रपटाने पटकावलेले ग्रां प्री आणि सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचे पुरस्कार यांचा त्यांच्या उल्लेखनीय कार्यामध्ये समावेश होतो. त्यांच्या ‘विंटर स्लीप’ या चित्रपटाने 2014 मध्ये भरलेल्या 67 व्या कान चित्रपट महोत्सवात पाल्मा डोर पुरस्कार मिळवला. सर्वोत्कृष्ट आंतरराष्ट्रीय फीचर फिल्म साठीच्या अकादमी पुरस्कारांसाठी तुर्कस्थानतर्फे “अबाउट ड्राय ग्रासेस” सह सेलन यांच्या एकूण सहा चित्रपटांच्या प्रवेशिक सादर करण्यात आल्या आहेत.

Share

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!