महाराष्ट्र

सांगली जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंक व्यवहारांतील दोषींवर कारवाई -: सहकार मंत्री दिलीप वळसे पाटील

 

            मुंबई : सांगली जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंक कामकाजाबाबत प्राप्त तक्रारींच्या अनुंषगाने विभागीय सहनिबंधक ,सहकारी संस्था कोल्हापूर यांनी केलेल्या चौकशीनुसार दोषींवर कारवाई करण्यात आली आहे. जबाबदारी  निश्चितीसाठी  प्राधिकृत अधिका-याची नेमणूक करुन त्यानुसार चौकशी सुरु आहे, असे सहकार मंत्री दिलीप वळसे पाटील यांनी विधानपरिषदेत सांगितले.

            सांगली जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंक लि.सांगली या बॅंकेमध्ये गैरव्यवहार झाल्याच्या पार्श्वभुमीवर शासनाने करावयाच्या कार्यवाही व उपाययोजनाबाबत सदस्य गोपीचंद पडळकर यांनी उपस्थित केलल्या लक्षवेधीला उत्तर देताना मंत्री श्री.वळसे पाटिल बोलत होते.

            सांगली जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेने कर्जदार संस्थांना बोगस कर्ज वाटप केल्याचे निदर्शनास आलेले नाही. तथापि, विभागीय सहनिबंधक, सहकारी संस्था (लेखापरीक्षण) कोल्हापूर यांनी केलेल्या चौकशीनुसार बँकेने सन २०१२-२०१३ व २०१९-२०२० या कालावधीत ३ कंपन्यांना मंजूर केलेल्या कर्जप्रकरणात अनियमितता झाल्याचे आढळून आले आहे. बँकेने सन २०१९ या कालावधीत केलेल्या तांत्रिक कर्मचाऱ्यांच्या नोकरभरतीत २ उमेदवारांनी अनुभवाचे बोगस दाखले सादर केल्याचे आढळून आले आहे. त्यानुषंगाने या तांत्रिक कर्मचाऱ्यांवर बँकेच्या स्तरावरुन कारवाई करण्यात येत असल्याचे मंत्री श्री.वळसे पाटील यांनी सांगितले.

            बँकेच्या कामकाजाबाबत प्राप्त झालेल्या विविध तक्रारींच्या अनुषंगाने चौकशी करण्यासाठी सहकार आयुक्त व निबंधक यांच्या आदेशान्वये  डी. टी. छत्रीकर, विभागीय सहनिबंधक, सहकारी संस्था (लेखापरीक्षण), कोल्हापूर यांचे अध्यक्षतेखाली चौकशी समिती स्थापन करण्यात आली होती. सदर चौकशी समितीने  तिचा अहवाल सहकार आयुक्त यांना सादर केला आहे. सदर चौकशी अहवालाच्या अनुषंगाने विभागीय सहनिबंधक, सहकारी संस्था, कोल्हापूर यांनी  कलम ८३ अन्वये चौकशी करण्यासाठी उपनिबंधक, सहकारी संस्था, कराड यांची चौकशी अधिकारी म्हणून नेमणूक केली होती. चौकशी अधिकारी यांनी त्यांचा अहवाल सादर केला आहे. सदर अहवालामध्ये नमूद केल्याप्रमाणे तांत्रिक पदांच्या नोकरभरतीच्या अनुषंगाने विभागीय सहनिबंधक, सहकारी संस्था, कोल्हापूर यांनी कलम ७९ अन्वये बँकेस निर्देश दिले आहेत.

            बँकेने  ६ मालमत्ता रारफेसी कायद्यातील तरतुदीच्या अनुषंगाने रु. २६४ कोटी एवढ्या रकमेस खरेदी केल्या आहेत. त्यापैकी २ मालमत्ता बँकेने भाडेतत्वावर चालविण्यास दिल्या असून ४ मालमत्ता बँकेच्या ताब्यात आहेत. विभागीय सहनिबंधक, सहकारी संस्था, कोल्हापूर विभाग, कोल्हापूर यांनी महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम, १९६० चे कलम ८८(१) अन्वये जबाबदारी निश्चितीसाठी उपनिबंधक, सहकारी संस्था, कोल्हापूर शहर यांची प्राधिकृत अधिकारी म्हणून नेमणूक करण्यात आली असून त्यानुसार सध्या चौकशीचे कामकाज सुरु असल्याचे मंत्री श्री.वळसे पाटील यांनी सांगितले. या चर्चैत सदस्य अमोल मिटकरी यांनी सहभाग घेतला.

Share

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!