प्राणी जन्म नियंत्रणाच्या अनुषंगाने शासकीय यंत्रणांनी परस्पर समन्वय ठेवावा ; जिल्हाधिकारी अशोक काकडे
प्राणी जन्म नियंत्रण बाबतच्या बैठकीत सूचना

दर्पण न्यूज मिरज/सांगली : प्राणी जन्म नियंत्रणाच्या अनुषंगाने संबंधित शासकीय यंत्रणांनी आपापसांमध्ये समन्वय ठेवावा. भटक्या, मोकाट कुत्र्यांना आवर घालण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशांचे अनुपालन करून प्रभावी उपाययोजना कराव्यात. याबाबतचा आढावा दर महिन्याला घेतला जाईल, अशा सूचना जिल्हाधिकारी अशोक काकडे यांनी आज येथे दिल्या.
प्राणी जन्म नियंत्रण बाबतच्या बैठकीच्या अध्यक्षस्थानावरून ते बोलत होते. जिल्हाधिकारी कार्यालयाच्या बैठक कक्षात आयोजित या बैठकीस जिल्हा पशुसंवर्धन उपायुक्त डॉ. अजयनाथ थोरे, जिल्हा सहआयुक्त नगरपरिषद प्रशासन शाखा दत्तात्रय लांघी यांच्यासह विभागीय नियंत्रक राज्य परिवहन महामंडळ, आरोग्य विभाग, कार्यकारी अभियंता, सा. बां. विभाग, ग्रामपंचायत विभाग, जि. प. सांगली, जिल्ह्यातील सर्व नगरपालिका व नगरपरिषदेचे मुख्याधिकारी, सहायक आयुक्त पशुसंवर्धन, पशुधन विकास अधिकारी (विस्तार) व महापालिकेचे पशुवैद्यकीय अधिकारी उपस्थित होते.
जिल्हाधिकारी अशोक काकडे म्हणाले, जिल्ह्यातील शैक्षणिक संस्था, रुग्णालये, क्रीडा संकुल, बस स्थानके व रेल्वे स्थानकांच्या परिसराला कुंपण, भिंती, दरवाजे आणि इतर संरक्षणात्मक उपाययोजना करून संबंधित परिसर सुरक्षित करावा. जिल्ह्यातील महामार्गावरील भटकी जनावरे व प्राणी यांना पकडून योग्य आश्रय स्थानामध्ये ठेवावे. भटक्या कुत्र्यांना पकडून निर्बीजीकरण, लसीकरण व जंत निर्मूलन करावे. तसेच, त्यांना खाऊ घालण्यासाठी ठिकाणे निश्चित करावीत. तक्रार निवारणकरिता हेल्पलाइन क्रमांक तयार करावेत. तसेच जिल्ह्यातील शासकीय आणि खाजगी रुग्णालयांनी रेबीज प्रतिबंधक लस व इम्युनोग्लोबुलिनचा अनिवार्य साठा उपलब्ध ठेवावा, असे त्यांनी स्पष्ट केले.
ज्या नागरिकांकडे सध्या पाळीव श्वान आहेत त्यांनी आपले श्वान रस्त्यावर फिरवल्यानंतर त्यांची विष्ठेची स्वतः विल्हेवाट लावावी अन्यथा त्यांच्यावर दंडात्मक कारवाई करण्याचे जिल्हाधिकारी अशोक काकडे यांनी यावेळी निर्देश दिले. तसेच, शाळांमध्ये भटक्या कुत्र्यांमुळे होणारे आजार आणि अनुषंगिक उपाययोजना यांच्याबाबत जनजागृती मोहीम घेण्यात यावी, असेही त्यांनी सूचित केले.



