आष्टा येथे कायदेविषयक जनजागृती शिबीर संपन्न

दर्पण न्यूज मिरज/सांगली : महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिकरण, उच्च न्यायालय मुंबई यांच्याकडील कॉमन मिनिमम प्रोग्रॅमनुसार जिल्हा विधी सेवा प्राधिकरण यांच्या वतीने विलासराव शिंदे माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय आष्टा येथे नुकतेच कायदेविषयक जनजागृतीपर शिबीर घेण्यात आले. मुख्याध्यापक विशाल शिंदे कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते. यावेळी जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे सचिव गि. ग. कांबळे, भारती विद्यापीठ न्यू लॉ कॉलेज, सांगलीचे प्रा. प्रशांत जरंडीकर, जाकीर पठाण, गणपती शिंदे आदि उपस्थित होते.
जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे सचिव गि. ग. कांबळे म्हणाले, नवीन मोटार वाहन कायदे अंतर्गत बालकांनी आपले वय 18 वर्षे पूर्ण झाल्यानंतरच मोटार परवाना घेवूनच मोटार चालवावी व पालकांनी लहान मुलांना विना परवाना मोटार चालवण्यास देवू नये. अन्यथा वाहन मालक यांच्यावर गंभीर गुन्हा दाखल होवून आर्थिक नुकसान होते याबाबत मार्गदर्शन केले. तसेच जिल्हा विधी सेवा प्राधिकरणामार्फत देण्यात येणाऱ्या मोफत सल्ला, विधी सेवा तसेच हेल्पलाइन नंबर 15100 यावरती संपर्क साधून आपण घरबसल्या विधीज्ञामार्फत मोफत सल्ला घेऊ शकतो, असे संबोधित केले.
प्रा. प्रशांत जरंडीकर यांनी सायबर क्राईमबाबत उपस्थितांना मार्गदर्शन केले. यामध्ये त्यांनी मोबाईलव्दारे होणारे सायबर क्राईम कसे होतात याचे उदाहरण देऊन सविस्तर माहिती दिली. विविध सायबर क्राईमचे प्रकार सांगून अलिकडच्या काळात ऑनलाईन फसवणूक, बँकिंग फ्रॉड, सोशल मीडियावरील खोटी खाती, तसेच मोबाईलद्वारे होणारे सायबर गुन्हे वाढलेले दिसून येत असल्याचे सांगितले. नागरिकांनी याबाबत जागरूक राहणे अत्यंत आवश्यक आहे. कोणालाही आपल्या बँक खात्याची माहिती देऊ नये, संशयास्पद लिंक किंवा ई-मेल उघडू नये, सोशल मीडियावर वैयक्तिक माहिती शेअर करताना काळजी घ्यावी. डिजीटल मीडियावरुन माध्यमाद्वारे इतर अनोळखी व्यक्तींना माहितीची देवाणघेवाण करू नये. फसवणूक झाल्यास त्वरित जवळच्या पोलीस ठाण्यात संपर्क साधावा, असे आवाहन करून सायबर क्राईमविषयी सर्व माहिती आपल्या पालकांना सांगावी, असे त्यांनी उपस्थित विद्यार्थ्यांना सांगितले.
स्वागत, प्रास्ताविक व सूत्रसंचालन जावीर पठाण यांनी केले. आभार गणपती शिंदे यांनी मानले. यावेळी एकूण 168 विद्यार्थी व विद्यार्थिनी आणि शिक्षक उपस्थित होते. शिबीराचे नियोजन जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे सचिव गि. ग. कांबळे व अधिक्षक शंकरराव वनखेडे, वरिष्ठ लिपिक नितीन आंबेकर, कनिष्ठ लिपिक संतोष खाटारे यांनी केले.



