शक्तीपीठ” महामार्ग रद्द झालाच पाहिजे ; सांगली जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन
आमदार डॉ विश्वजीत कदम, खासदार विशाल पाटील यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित
सांगली : शेतकऱ्यांना उध्वस्त करू पाहणारा “शक्तीपीठ” महामार्ग रद्द झालाच पाहिजे या मागणीला कालच जिल्हा काँग्रेसच्यावतीने पाठिंबा जाहीर करण्यात आला होता. या संदर्भात सांगलीत जिल्हाधिकारी कार्यालय येथे धरणे आंदोलन करीत सर्वपक्षीय नेते व शक्तीपीठ महामार्ग विरोधी संघर्ष समितीच्या पदाधिकाऱ्यांच्या समवेत “शक्तीपीठ” महामार्ग विरुद्धचे निवेदन पालकमंत्री ना. सुरेश खाडे यांना दिले.
केंद्रातील मोदी सरकार व राज्यातील महायुती सरकार बड्या कंत्राटदारांना पोसणारे सरकार आहे हे पुन्हा एकदा “शक्तीपीठ” महामार्गमुळे सिद्ध झाले आहे. विशेष म्हणजे सांगली व कोल्हापूर हे पूरग्रस्त जिल्हे आहेत. या महामार्गामुळे पुराचा धोका आणखी बळावणार आहे. कोणतीच मागणी नसताना बागायती जमिनीचं वाटोळे करून केवळ आणि केवळ कंत्राटदारांकडून पैसा उखळण्यासाठी हा महामार्ग शेतकऱ्यांच्या मानगुटीवर बांधला जात आहे. या ऐवजी एमआयडीसीसाठी, नव्या बाजार समित्यांसाठी सरकारने प्रयत्न करणे गरजेचे असल्याचे याप्रसंगी नमूद केले. इतके करूनही शासनाचे डोके ठिकाणावर आले नाही तर हा संघर्ष आणखी तीव्र केला जाणार आहे.
या आंदोलनास खासदार विशाल पाटील, माजी मंत्री आ.डॉ. विश्वजीत कदम साहेब, आ. अरुण (अण्णा) लाड, मा. पृथ्वीराजबाबा पाटील, मा.महेंद्रअप्पा लाड, शक्तीपीठ महामार्ग विरोधी संघर्ष समितीचे पदाधिकारी व बहुसंख्य शेतकरी बांधव उपस्थित होते.