सांगली
आंतरराष्ट्रीय योग दिनाच्या निमित्ताने केंद्रीय संचार ब्यूरो, भारत सरकार आणि सांगली मधील जत येथील श्री रामराव विद्यामंदिर व कनिष्ठ महाविद्यालय, लायन्स इंग्लिश मीडियम स्कूल आणि ज्युनियर कॉलेज आदी शैक्षणिक संस्थांच्या संयुक्त विद्यमाने योग प्रात्यक्षिके, योग आधारित मार्गदर्शन असा कार्यक्रम श्री रामराव विद्यामंदिर व कनिष्ठ महाविद्यालय येथे आज पार पडला. यावेळी जतचे प्रांताधिकारी अजय नष्टे आणि तहसीलदार जीवन बनसोडे आदी मान्यवरांची प्रमुख उपस्थिती होती.

यावेळी पतंजलीच्या योग साधकांनी सर्वांकडून योग प्रोटोकॉल म्हणजे विशिष्ट योगाभ्यास करून घेतला. केंद्रीय संचार ब्यूरोच्या कोल्हापूर कार्यालयाने आयोजित केलेल्या योग विषयक स्पर्धांच्या विजेत्यांना यावेळी मान्यवरांच्या हस्ते बक्षिसे देण्यात आली तसेच केंद्रीय संचार ब्यूरोने यावेळी प्लास्टिक टाळा पर्यावरण वाचवा आणि आंतरराष्ट्रीय योग दिनाचे महत्त्व या गोष्टी मांडणाऱ्या कापडी पिशव्यांचे वितरण केले.

दरवर्षी 21 जून रोजी साजरा केला जाणारा आंतरराष्ट्रीय योग दिन हा एक महत्त्वाचा उत्सव आहे, यामुळे जगभरात योगाभ्यास आणि त्याच्या लाभांविषयी जनजागृती होत आहे. “जग दहावा आंतरराष्ट्रीय योग दिवस साजरा करत असून एकता आणि सामंजस्य साजरे करणारी ही एक कालातीत प्रथा आहे. योगाने सांस्कृतिक आणि भौगोलिक सीमांपलीकडे जाऊन, समग्र कल्याणाच्या शोधात जगभरातील लाखो लोकांना एकत्र आणले आहे.” असा संदेश पंतप्रधानांनी या निमित्ताने सर्वांना दिला आहे.

दरवर्षी 21 जून रोजी साजरा केला जाणारा आंतरराष्ट्रीय योग दिन हा एक महत्त्वाचा प्रसंग आहे जो जगभरात योगाच्या सरावाला आणि फायद्यांना प्रोत्साहन देतो.
योगाच्या सरावाद्वारे, व्यक्ती इतरांशी आणि जगाशी असलेले त्यांचे संबंध ओळखून त्यांच्या अंतर्मनात प्रवेश करतात. सर्वांमध्ये एकीची भावना प्रस्थापित करून आपल्याला समाजाशी एकरूप होण्यास मदत होते. त्यामुळे यावर्षीच्या आंतरराष्ट्रीय योग दिनाची स्वतःसाठी तसेच समाजासाठी योग अशी संकल्पना आहे.
आंतरराष्ट्रीय योग दिनामुळे वसुधैव कुटुंबकमची तत्त्वे स्वीकारण्याची आणि जागतिक सलोख्यासाठी काम करण्याची प्रेरणा मिळते.