केंद्रीय संचार ब्युरोतर्फे सांगली मधील जत येथे आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त विविध कार्यक्रम

कोल्हापूर, :
21 जून रोजी साजरा होणाऱ्या आंतरराष्ट्रीय योग दिनाच्या निमित्ताने केंद्रीय संचार ब्यूरो, भारत सरकार आणि सांगली मधील जत येथील श्री रामराव विद्यामंदिर व कनिष्ठ महाविद्यालय, लायन्स इंग्लिश मीडियम स्कूल आणि ज्युनियर कॉलेज आदी शैक्षणिक संस्थांच्या संयुक्त विद्यमाने योग स्पर्धा, योग प्रात्यक्षिके, योग आधारित मार्गदर्शन असा कार्यक्रम श्री रामराव विद्यामंदिर व कनिष्ठ महाविद्यालय येथे आयोजित करण्यात आला आहे.
सकाळी सात ते आठ वाजेपर्यंत चालणाऱ्या या कार्यक्रमामध्ये पतंजली योगपीठाचा देखील सक्रिय सहभाग आहे. या निमित्ताने होणाऱ्या योग प्रात्यक्षिकांमध्ये नागरिकांनी सहभाग घेऊन आपणा सर्वांच्या आरोग्याची गुरुकिल्ली असलेल्या योग सरावाच्या दिशेने आणखी एक पाऊल उचलावे असे आवाहन संयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे.
दरवर्षी 21 जून रोजी साजरा केला जाणारा आंतरराष्ट्रीय योग दिन हा एक महत्त्वाचा प्रसंग आहे जो जगभरात योगाच्या सरावाला आणि फायद्यांना प्रोत्साहन देतो.
योग, त्याच्या एकता आणि परस्परांशी जोडले जाण्याच्या मूलभूत तत्त्वांसह, “वसुधैव कुटुंबकम” या संकल्पनेचे मूर्त स्वरूप आहे. सर्वांमध्ये एकीची भावना प्रस्थापित करून आपल्याला समाजाशी एकरूप होण्यास मदत होते. त्यामुळे यावर्षीच्या आंतरराष्ट्रीय योग दिनाची स्वयं तसेच समाजासाठी योग अशी संकल्पना आहे.
आंतरराष्ट्रीय योग दिनामुळे वसुधैव कुटुंबकमची तत्त्वे स्वीकारण्याची आणि जागतिक सलोख्यासाठी काम करण्याची प्रेरणा मिळते. आंतरराष्ट्रीय योग दिनाच्या निमित्ताने उद्या 20 जून रोजी या शाळांमध्ये योग प्रात्यक्षिकांच्या स्पर्धा देखील आयोजित करण्यात येतील.