सांगली येथे कायदेविषयक शिबीर संपन्न

सांगली :- जिल्हा विधी सेवा प्राधिकरण सांगली व स्व. श्रीमंतीबाई सातगोंडा पाटील मजलेकर प्रेक्टिसिंग स्कूल सांगली यांच्या संयुक्त विद्यमाने कायदेविषयक जनजागृती शिबीर आयोजित करण्यात आले. या कार्यक्रमास प्रमुख पाहुणे जिल्हा विधी सेवा प्राधिकरण सांगली चे सचिव गि. ग. कांबळे होते. प्रमुख वक्ते म्हणून अॅड. अमोल डोंबे व अॅड. जयंत नवले होते.
स्व. श्रीमंतीबाई सातगोंडा पाटील मजलेकर प्रेक्टिसिंग स्कूल सांगली येथे आयोजित या कार्यक्रम प्रसंगी जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे सचिव गि. ग. कांबळे यांनी उपस्थित विद्यार्थ्यांना मोटार वाहन कायद्याबद्दलची माहिती विद्यार्थ्यांना समजेल अशा सोप्या आणि हसतखेळत वातावारणात सांगितली. तसेच बालकांना आपण मोठे झाल्यानंतर कोणते अधिकारी होणार, अधिकारी होण्याकरीता लागणारे परिश्रम कसे करावे, तसेच आपण आई वडीलांचे व गुरूजनांचा आदर करून ते जे सांगतील त्याप्रमाणे वर्तणुक केली तर आपण निश्चितच भविष्यामध्ये मोठे अधिकारी होणार असल्याचे सांगितले.
अॅड. अमोल डोंबे यांनी बालकांसाठी अनुकुल कायदेशीर सेवा आणि त्यांचे संरक्षण योजना 2015 या विषयावर मार्गदर्शन केले. या कायद्याची माहिती बालकांना समजेल अशा भाषेमध्ये समजावून सांगितले. मुलांनी अभ्यासाकडे लक्ष देवून मोठे अधिकारी व्हावे, असा सल्ला त्यांनी यावेळी दिला.
अॅड. जयंत नवले यांनी बालकांना मोफत आणि सक्तीच्या शिक्षणाचा अधिकार अधिनियम, २००९ या विषयावर विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. सर्वांसाठी शिक्षण हे मोफत व सक्तीचे असल्याचे प्रतिपादन ॲड. नवले यांनी केले.
प्रास्ताविक विजय कोगनोळे यांनी केले. स्वागत मुख्याध्यापक अमर पाटील यांनी तर सूत्रसंचालन सहशिक्षिका सुजाता आळतेकर यांनी केले. आभार नितीन आंबेकर यांनी मानले. शिबीराचे सर्व नियोजन स्व. श्रीमंतीबाई सातगोंडा पाटील मजलेकर प्रक्टिसिंग स्कूल सांगली येथील मुख्याध्यापक, शिक्षक, सर्व शिक्षकेत्तर कर्मचारी यांनी केले. विधी साक्षरता शिबीरास शाळेतील मोठ्या प्रमाणात विद्यार्थी-विद्यार्थीनी, कर्मचारी वर्ग उपस्थित होते.