कागल येथे पोषण महिन्याच्या निमित्तानं मल्टी मीडिया प्रदर्शनाचे आयोजन

कोल्हापूर :
केंद्रीय संचार ब्यूरो आणि पंचायत समिती कागल यांच्या संयुक्त विद्यमाने कागल पंचायत समिती कार्यालयाच्या प्रांगणात पोषण माह तसेच भरड धान्यांचे महत्त्व या विषयावर मल्टी मिडिया प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले आहे.
25 सप्टेंबर ते 27 सप्टेंबर असे तीन दिवस चालणाऱ्या या प्रदर्शनामध्ये भरड धान्ये, पोषण माह तसेच सरकारचे मिशन इंद्रधनुष या बाबतीत माहिती मांडण्यात आली आहे.
या प्रदर्शनीमध्ये इतर माहिती बरोबरच व्हर्चुअल रियालिटी गॉगल्स आणि इतर डिजिटल माध्यमातून देखील माहिती प्रदान करण्यात येईल. तीन दिवसांच्या या पोषणविषयक सोहळ्यामध्ये पाककला स्पर्धा, निबंध स्पर्धा तसेच इतर स्पर्धांचे देखील आयोजन करण्यात आले आहे.
या प्रदर्शनीला मोठय़ा प्रमाणावर भेट देऊन नागरिकांनी याचा फायदा घ्यावा असे आवाहन कागलचे गटविकास अधिकारी कुलदीप बोंगे आणि केंद्रीय संचार ब्यूरो कार्यालयाने केले आहे.
केंद्र सरकारचा केंद्रीय संचार ब्यूरो विभाग विविध सरकारी योजनांवर प्रदर्शनी तसेच इतर प्रसिद्धी कार्यक्रमांचे आयोजन करत असतो.
पोशन माह, ज्याला राष्ट्रीय पोषण महिना म्हणूनही ओळखले जाते, हा भारतातील एक महत्त्वाचा उपक्रम आहे ज्याचा उद्देश पोषणाच्या महत्त्वाविषयी जागरुकता निर्माण करणे आणि निरोगी जीवनशैलीला प्रोत्साहन देणे आहे. सप्टेंबरमध्ये महिनाभर चालणारी मोहीम देशातील विशेषत: महिला आणि मुलांमधील कुपोषणाच्या महत्त्वाच्या समस्येकडे लक्ष वेधण्याचा प्रयत्न करते.
वर्तणुकीतील सकारात्मक बदलांना प्रेरणा देण्यासाठी आणि कुपोषण निर्मूलनासाठी सामूहिक जबाबदारीची भावना वाढवण्यात पोषण माह महत्त्वाची भूमिका बजावतो. समुदाय आणि व्यक्तींना एकत्र आणून हे अभियान लोकांसाठी एक निरोगी आणि अधिक पोषणयुक्त भविष्य निर्माण करण्याचा प्रयत्न करते.
रस्ते सुरक्षा अभियान
यावेळी रस्ता सुरक्षा अभियानांतर्गत प्रादेशिक परिवहन विभाग कोल्हापूर द्वारे सचित्र माहिती प्रदर्शित करण्यात येईल.