सांगली येथील काळी खण सुशोभिकरण प्रकल्प, हनुमाननगरच्या भाजी मंडईचा लोकार्पण


दर्पण न्यूज मिरज/सांगली :- सांगली मिरज कुपवाड महानगरपालिका क्षेत्रातील काळी खण सुशोभिकरण प्रकल्प व हनुमाननगर येथील अद्ययावत भाजी मंडई या प्रकल्पांचे लोकार्पण राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण, संसदीय कार्य मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते आज करण्यात आले.
भाजी मंडई कार्यक्रमास आमदार इद्रिस नायकवडी, जिल्हाधिकारी अशोक काकडे, काळी खण सुशोभिकरण कार्यक्रमास आमदार सुधीर गाडगीळ, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विशाल नरवाडे यांच्यासह दोन्ही कार्यक्रमास महापालिका आयुक्त सत्यम गांधी, अतिरिक्त आयुक्त राहुल रोकडे, अश्विनी पाटील, शहर अभियंता पृथ्वीराज चव्हाण, कार्यकारी अभियंता (पाणीपुरवठा) चिदानंद कुरणे, कार्यकारी अभियंता (विद्युत) अमर चव्हाण, उप अभियंता महेश मदने, महापालिकेचे सर्व विभागप्रमुख आदि उपस्थित होते.
हे दोन्ही प्रकल्प सांगलीच्या विकासातील महत्वाचे टप्पे असल्याचे सांगून पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी समाधान व्यक्त करत महापालिका प्रशासनाचे अभिनंदन व कौतुक केले.
काळी खण सुशोभिकरणाने सांगलीच्या सौंदर्यात भर
सांगली शहराच्या ऐतिहासिक ‘काळी खण’ परिसराला नवे रूप देत, आधुनिक सुविधांनी समृद्ध अशा काळी खण सुशोभीकरणाने सांगलीच्या पर्यटन सौंदर्यात भर पडली आहे. सुशोभीकरण कामे दोन महत्त्वपूर्ण टप्प्यांत पूर्ण करण्यात आली असून, संपूर्ण परिसराचे आधुनिकीकरण व सौंदर्यवर्धन केल्यामुळे काळीखण हे सांगलीकरांसाठी तसेच पर्यटकांसाठी एक आकर्षक स्थळ ठरणार आहे. यासाठी पहिल्या टप्प्यात 1 कोटी 5 लाख 57 हजार 732 रूपये इतक्या निधीतून कँटीलीव्हर डेक, चेन लिंक बांधणी, स्टील रेलिंग, प्लंबिंग, लँडस्केपिंग, वृक्षारोपण, इलेक्ट्रिफिकेशन, स्टोन क्रेट फिनिशिंग ही कामे करण्यात आली आहेत. दुसऱ्या टप्प्यात 4 कोटी 42 लाख 98 हजार 20 रूपये इतक्या निधीतून R.C.C. रिटेनिंग वॉल, कंपाऊंड वॉल, फूड स्टॉल्स, ग्रॅनाइट फ्लोरिंग, ग्लास रेलिंग, म्युझिकल फाउंटेन, लेसर शो, व्हिडिओ प्रोजेक्शन सिस्टम या कामांचा समावेश आहे.
दोन्ही टप्प्यांतील कामांमुळे काळीखण परिसर आता मनोरंजन, फिरण्यासाठी हरित जागा, तसेच सांस्कृतिक कार्यक्रमांसाठी उपयुक्त केंद्र म्हणून विकसित झाला आहे.
हनुमाननगर येथील अत्याधुनिक भाजी मंडईची माहिती
सांगली-मिरज-कुपवाड शहर महानगरपालिकेतर्फे हनुमाननगर परिसरात अत्याधुनिक भाजी मंडई उभारण्यात आली आहे. ही नवीन भाजी मंडई स्वच्छ, सुरक्षित आणि आकर्षक सोयी सुविधांनी सज्ज आहे. सुमारे 1.90 कोटी निधीतून बांधण्यात आलेली ही मंडई परिसरातील भाजी विक्रेत्यांसाठी सुरक्षित, स्थिर आणि नियोजनबद्ध बाजारपेठ उपलब्ध करून देणार आहे. ही बाजारपेठ प्रशस्त, स्वच्छ आणि हवेशीर भाजी विक्री स्टॉल्स, सुरक्षिततेसाठी मजबूत कंपाऊंड वॉल, काँक्रीट रोड व फ्लोरिंग, CCTV कॅमेरे, रात्रीसाठी हायमास्ट लाईट्स, टॉयलेट ब्लॉक, पिण्याच्या पाण्याची सुविधा या सोयी सुविधांनी सज्ज आहे.
या कार्यक्रमास महापालिकेचे माजी पदाधिकारी, अधिकारी, नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.


