शेतीला पाणी द्या ; शेतकऱ्यांच्या हितासाठी कॅनॉलमध्ये आंदोलन छेडणार : माजी उपसरपंच मोहननाना तावदर
वेळेत शेतीला पाणी न मिळाल्यास अनेक गावातील लोक एकत्र लढणार

भिलवडी: – नेहमीच आम्ही शेतकऱ्यांच्या हितासाठी आंदोलन छेडले आहे. शासनाने ७ मे पूर्वी कृष्णा कॅनॉलमध्ये वसगडे पर्यंत पाणी न सोडल्यास मतदानादिवशी कॅनॉल मध्ये बसून तीव्र आंदोलन करणार, असा इशारा माजी उपसरपंच मोहन तावदर यांनी दिला.
तावदर म्हणाले , भारत देश कृषीप्रधान आहे. शेतीवर आपली रोजी रोटी चालते. शेतकरी जगला पाहिजे, अशी आपल्या सर्वांचीच भावना आहे. शेतकऱ्यांसाठी हे सरकार कटिबद्ध आहे, असं वारंवार सांगण्यात आलं आहे. असं असताना वसगड्यापर्यंतच्या कॅनॉलला पाणी नाही. इतर गावांना पाणी देता, मग बाकीच्या शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडणार आहात का? आज सरासरी 40 अंश सेल्सिअस तापमान आहे. पिकं वाळत चालली आहेत. अशावेळी आपण पाण्याची तजवीज करणार आहात की नाही? याबाबत आपण ठोस आश्वासन द्यावे. ७ मे २०२४ पर्यंत कृष्णा कॅनाॅलच्या वसगड्यापर्यंत पाणी आले नाही तर मतदानादिवशी कॅनॉलमध्ये उपोषणासाठी मी बसणार आहे. याची नोंद घ्यावी. तत्पूर्वी आपण संबंधित अधिकाऱ्यांनी संपर्क साधावा आणि हा प्रश्न सोडवावा. शेतकऱ्यांना न्याय मिळावा ही अपेक्षा आहे, अशा आशयाचे निवेदन भिलवडी गावचे माजी उपसरपंच मोहन तावदर यांनी पाटबंधारे विभाग माळवाडी शाखा यांना दिले आहे.
वेळीच शेतकऱ्यांना न्याय न मिळाल्यास मी अनेक गावातील लोकांना हाताशी धरून आंदोलनाची दिशा ठरवणार, असेही माजी उपसरपंच मोहन तावदर यांनी सांगितले.