दिव्यांग संजय चौगुले यांची भिलवडी परिसरातील दिव्यांगांसाठी तळमळीची धडपड ..!
आदर्श शेती अन् जीवनप्रवास अनेकांना प्रेरणास्थान

भिलवडी: सांगली जिल्हा पलूस तालुक्यातील भिलवडी येथील दिव्यांग संजय चौगुले यांचं भिलवडी परिसरात दिव्यांगांसाठी दमदार काम सुरू आहे. दिव्यांग या पार्श्वभूमी आणि परिस्थितीमध्ये संजय चौगुले सामाजिक बांधिलकी जपत लोकांच्या मदतीसाठी धावून येणे आणि आदर्श शेती करण्याची धडपड पाहिली तर अनेकांना अचंबित करणारे आहे. तर काहीजणांचे ते प्रेरणास्थान झाले आहेत.
लहानपणापासून संजय चौगुले दिव्यांग. गमतीदार, प्रेमळ आणि नेहमीच हसतमुख असणारे संजय यांनी दिव्यांग लोकांची सेवा हीच ईश्वर सेवा मानली आहे. नेहमीच ते दिव्यांग लोकांच्या न्याय हक्कासाठी लढताना दिसतात. दिव्यांगांसाठी प्रशासकीय यंत्रणेच्या कामकाजाची माहिती करून देणे, त्यांना शासकीय योजनाची माहिती देणे, त्या योजना सुरू करण्यासाठीही प्रयत्न करत असतात.
पोलिओ लसीकरण मोहिमेत सहभाग घेऊन ते आपल्या तीन चाकी सायकल वरून प्रबोधन करीत असतात. लोकांच्या हितासाठी जगणाऱ्या संजू चौगुले यांची आदर्श शेती करण्याची पद्धत अनेकांना प्रेरणादायी ठरत आहे.
दिव्यांग व्यक्ती असूनही ते चांगल्या माणसाला लाजवेल अशा कामगिरीतून भिलवडी परिसरासह पलूस तालुक्यात अनेकांचे प्रेरणास्थान झाले आहेत. भिलवडी सारख्या ग्रामीण भागात संजय चौगुले दिव्यांग व्यक्ती जर लोकांच्या हितासाठी धडपडत असेल तर आपणही त्यांचा आदर्श घेऊन धडपड करूया असे नक्कीच सुज्ञ लोकांना वाटत असावे.
संजूच्या सामाजिक कार्याला सलाम..!