सांगली : मतदार याद्यांच्या विशेष संक्षिप्त पुनरिक्षण कार्यक्रमांतर्गत मतदार नोंदणी करण्याचे आवाहन

सांगली : निवडणुक आयोगाकडील सुचनेनुसार 282-सांगली विधानसभा मतदार संघामध्ये दि. 1 जुलै 2024 या अर्हता दिनांकावर आधारित मतदार याद्यांचा विशेष संक्षिप्त पुनरिक्षण कार्यक्रम (दुसरा) राबविण्यात येणार आहे. पुनरिक्षण कार्यक्रमांतर्गत दि. 21 जुलै 2024 रोजी प्रारुप मतदार यादी प्रसिद्ध केली जाणार आहे. दि. 25 जुलै 2024 ते 9 ऑगस्ट 2024 या कालावधीमध्ये हरकती व दावे स्विकारण्यात येणार आहेत व मतदार नोंदणीची विशेष मोहिम राबविली जाणार आहे. या मोहिमेमध्ये जास्तीत जास्त सहभाग घेवून मतदार नोंदणी करावी, असे आवाहन 282-सांगली विधानसभा मतदार संघाचे मतदार नोंदणी अधिकारी तथा जिल्हा पुरवठा अधिकारी आशिष बारकुल यांनी केले आहे.
अंतिम मतदार यादी दि. 20 ऑगस्ट 2024 रोजी प्रसिध्द करण्यात येणार आहे. या कालावधीत नवमतदारांनी फॉर्म नं. 6 भरुन नावाची नोंदणी करावी, किंवा voter helpline App व वेबसाईट nvsp.in वर ऑनलाईन मतदार नोंदणी करावी. स्थलांतरासाठी 7 नं. तसेच नावात दुरुस्ती किंवा फोटोत बदल असल्यास 8 नं. फॉर्म भरून घेण्यात येणार आहेत. पुर्व पुनरिक्षण उपक्रमांमध्ये दि. 25 जून 2024 ते दि. 24 जुलै 2024 अखेर H२H मध्ये मतदान केंद्रस्तरीय अधिकारी (BLO) घरोघरी जाऊन भेट देणार आहे. मतदार यादीची पडताळणी करणार आहे. मतदान केंद्राची पुर्नरचना, सुसुत्रीकरण, प्रमाणिकरण करणे व मतदार यादीतील त्रुटी असलीत तर त्या दूर करणे या सर्व बाबींचा अंतर्भाव पुर्व पुनरिक्षणामध्ये होणार असल्याचे श्री. बारकुल यांनी प्रसिध्दीपत्रकाव्दारे कळविले आहे.
–*************************
जात वैधता प्रमाणपत्रासाठी 2 जुलै पर्यंत विशेष मोहिम
सांगली, : राजर्षी शाहू महाराज जयंती पर्व च्या अनुषंगाने दि. 26 जून ते 2 जुलै 2024 या कालावधीत विद्यार्थ्यांना जात वैधता प्रमाणपत्र मिळण्यासाठी विशेष मोहिमेचे आयोजन करण्यात आले आहे. इयत्ता 11 वी व 12 वी विज्ञान शाखेतील, डिप्लोमा तृतीय वर्षातील तसेच व्यावसायिक अभ्यासक्रमांना प्रवेशाकरीता CET / प्रवेश परिक्षा दिलेल्या सर्व मागासवर्गीय विद्यार्थ्यांनी जात वैधता प्रमाणपत्र मिळण्यासाठी विहीत मुदतीत अर्ज सादर करावेत, असे आवाहन जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समितीचे संशोधन अधिकारी तथा सदस्य सचिव बाळासाहेब कामत यांनी केले आहे.
शैक्षणिक प्रयोजनार्थ ज्या अर्जदारांनी समिती कार्यालयाकडे जात प्रमाणपत्र पडताळणीचा अर्ज सादर केला आहे, तथापि प्रकरणात कागदपत्रे अपुरे आहेत, अशा अर्जदारांना त्रुटी पुर्तता करण्याबाबत नोंदणीकृत ई-मेल वर व लेखीपत्राद्वारे कळविले आहे, विशेष मोहिमेच्या अनुषंगाने अर्जदारांना समिती कार्यालयात सर्व मुळ कागदपत्रांसह उपस्थित राहणेबाबत text message द्वारे अवगत करण्यात येत आहे. कनिष्ठ व पदविका महाविद्यालयांना GOOGLE SPREADSHEET sanglicvc@gmail.com या ई-मेल वरुन तसेच सहाय्यक आयुक्त, समाज कल्याण, सांगली च्या whats app Group वरुन share करण्यात आली असून तात्काळ माहिती SPREADSHEET मध्ये भरण्यात यावी, असे आवाहन श्री. कामत यांनी केले आहे.