भिलवडी व्यापार संघटनेने विविध सामाजिक उपक्रम राबवून केला स्वातंत्र्य दिन साजरा : विद्यार्थिनीच्याहस्ते ध्वजारोहण

आधुनिक भारताचा कणा असणाऱ्या विद्यार्थ्याला केंद्राशी धरून व्यापार संघटनेचा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा करण्यात आला.
15 ऑगस्ट स्वातंत्र्यदिनी ध्वजारोहणाचा मान विद्यार्थिनीला देऊन, मोठ्या संख्येने ग्रामस्थांच्या उपस्थितीत स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा केला . यावेळी चितळे उद्योग समूहाचे उद्योजक श्री मकरंद चितळे उपस्थित होते.
ध्वजारोहणानंतर भिलवडीत व्यापाराच्या माध्यमातून प्रदीर्घ सेवा देणाऱ्या 50 ज्येष्ठ व्यापाऱ्यांना सन्मान चिन्ह देऊन गौरवण्यात आले, यावेळी ज्येष्ठ व्यापाऱ्यांच्या चेहऱ्यावरती एक वेगळेच समाधान जाणवत होते .
स्वातंत्र्य दिनाचे औचित्य साधून व्यापारी संघटनेने विद्यार्थ्यांसाठी रांगोळी स्पर्धेचे आयोजन केले होते, त्या रांगोळी प्रदर्शनाचे उद्घाटन भिलवडीतील ज्येष्ठ महिला भाजीपाला व्यापाऱ्यांच्या हस्ते घेण्यात आले . त्याचप्रमाणे विद्यार्थ्यांना टीव्ही आणि मोबाईल पासून परावृत्त करण्यासाठी व त्यांना व्यायामाची सवय लागण्यासाठी विद्यार्थ्यांसाठी सायकल स्पर्धा व धावण्याच्या स्पर्धाचे देखील आयोजन करण्यात आले होते, या उपक्रमासही विद्यार्थ्यांचा भरभरून प्रतिसाद मिळाला. विविध स्पर्धातील ४४ विजेत्या विद्यार्थ्यांना बक्षीसम्हणून मेडल, प्रमाणपत्र व रोख रक्कम देण्यात आली. स्पर्धेचा थरार अनुभवण्यासाठी ग्रामस्थांनी दक्षिण भाग सोसायटीच्या प्रांगणात प्रचंड गर्दी केलेली होती.
अशा प्रकारच्या उपक्रमाने विद्यार्थी घडण्यात व आधुनिक भारताचा पाया रचण्यात नक्कीच उपयोग होईल असा विश्वास ग्रामस्थांनी व्यक्त केला.
व्यापार संघटनेमार्फत स्वातंत्र्यदिनी आयोजित केलेल्या विविध उपक्रमांचे ग्रामस्थांनी कौतुक करून समाधान व्यक्त केले. स्वातंत्र्य दिन साजरा करण्यासाठी व्यापारी संघटनेतील सर्व पदाधिकारी, संचालक व सदस्यांनी मोलाचे योगदान दिले.