खेलो इंडिया युथ गेम्समध्ये महाराष्ट्राला तिसऱ्यांदा अजिंक्यपद

सांगली : या वर्षी 5 व्या खेलो इंडिया युथ गेम्स 2022-23 चे आयोजन मध्यप्रदेश राज्यामार्फत करण्यात आले. मध्यप्रदेश मध्ये 08 व दिल्ली येथे 01 असे एकूण 09 ठिकाणी 27 क्रीडा प्रकाराच्या स्पर्धाचे दि. 30 जानेवारी ते 12 फेब्रुवारी 2023 या कालावधीत आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेत महाराष्ट्र राज्याने सहभाग घेतलेल्या एकुण 24 क्रीडा प्रकारांपैकी राज्यास 20 क्रीडा प्रकारामध्ये 56 सुर्वणपदके, 55 रौप्यपदके व 50 कांस्यपदके अशी एकुण 161 पदके प्राप्त झाली असून 5 व्या खेलो इंडिया युथ गेम्समध्ये महाराष्ट्र राज्याने निर्विवाद वर्चस्व प्रस्थापित करीत अव्वल स्थान प्राप्त केले आहे. तर 41 सुर्वण पदकासह एकूण 128 पदके प्राप्त करून हरियाणा राज्याने व्दितीय स्थान प्राप्त केले आहे.
राज्यातील खेळाडूंनी देशाच्या नकाशावर महाराष्ट्राचे नाव क्रीडा क्षेत्रात अग्रक्रमावर पुन्हा एकदा कोरल्याबद्दल क्रीडा मंत्री गिरीश महाजन यांनी खेळाडूंचे हार्दिक अभिनंदन केले व आंतरराष्ट्रीय स्तरावरील क्रीडा स्पर्धांमध्ये देखील अशाच कामगिरीची खेळाडूंकडून अपेक्षा व्यक्त केली असून त्या करीता आवश्यक ती सर्व मदत करण्यास राज्य शासन तत्पर असल्याबाबत आश्वस्त केले आहे.
राज्याचे क्रीडा आयुक्त डॉ. सुहास दिवसे यांनी सर्व खेळाडूंचे अभिनंदन करून खेळाडूंना मुलभूत कौशल्यापासून तर पारंगत दर्जाचे प्रशिक्षण व त्या करीता आवश्यक असलेल्या सर्व सुविधा उपलब्ध करून देण्याकरीता नवीन क्रीडा विकास आराखडा तयार करीत असल्याचे प्रतिपादन केले असून या आराखड्याच्या आधारावर काम करून येणाऱ्या काही वर्षात राज्यातील खेळाडू आंतरराष्ट्रीय स्पर्धांमध्ये मोठ्या संख्येने पदके जिंकतांना दिसतील असा विश्वास व्यक्त केला आहे.
देशातील प्रतिभासंपन्न युवा पिढीला त्यांचे क्रीडा कौशल्य प्रदर्शित करण्याकरीता हक्काचे व्यासपीठ उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने केंद्र शासनाच्या क्रीडा विभागामार्फत दरवर्षी खेलो इंडिया युथ गेम्स या क्रीडा स्पर्धेचे आयोजन देशात करण्यात येत आहे. 5 व्या खेलो इंडिया युथ गेम्स मध्ये समावेश करण्यात आलेल्या एकूण 27 क्रीडा प्रकारांपैकी महाराष्ट्र राज्याने 24 क्रीडा प्रकारांमध्ये सहभाग नोंदविलेला होता. या 24 क्रीडा प्रकारांमध्ये एकूण 384 खेळाडू व 113 क्रीडा मार्गदर्शक व्यवस्थापक, सहाय्यक कर्मचारी वर्ग, अधिकारी व पदाधिकारी यांचा सहभाग होता.
सन 2019 मध्ये पुणे येथे आयोजित करण्यात आलेल्या दुसऱ्या खेलो इंडिया युथ गेम्समध्ये 18 क्रीडा प्रकाराचा समावेश होता. या क्रीडा स्पर्धेमध्ये 85 सुवर्ण पदकांसह एकूण 228 पदके प्राप्त करून महाराष्ट्र राज्याने प्रथम स्थान प्राप्त केले होते. तसेच सन 2020 मध्ये गुवाहाटी, आसाम येथे आयोजित करण्यात आलेल्या तिसऱ्या खेलो इंडिया युथ गेम्समध्ये 20 क्रीडा प्रकारांचा समावेश होता. या क्रीडा स्पर्धेमध्ये 78 सुवर्ण पदकांसह एकूण 256 पदके प्राप्त करून महाराष्ट्र राज्याने प्रथम स्थान प्राप्त केले होते.